पिंपरी-चिंचवड पोलिसांनी निवडणूक काळात पकडली पावणे दोन कोटींची रोकड
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या महिन्याभराच्या कालावधीत पुणे जिल्ह्यात ३४ कोटी ४४ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.त्यात पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पकडलेली एक कोटी ७६ लाख १७ हजार ५० एवढी रोख रक्कम आहे.
दरम्यान,परवाच्या मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने आजच जय्यत तयारी केली.
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गेल्या महिन्याभरात बेकायदेशीर ४९ पिस्तूले,रिव्हॉल्वर्स आणि शंभर जिवंत काडतूसे आणि ९३ तलवारी,कोयतेही पकडले.पावणे दोन कोटींच्या रोख रकमेच्या जोडीने त्यांनी एक कोटी १४ लाख ३२ हजार ३८२ रुपयांचा दारुसाठा आणि ३७ लाख ९३ हजाराचा गांजा जप्त केला.दहा गुंडटोळ्यांना मोका चा बडगा दाखवला,तर सात गुन्हेगारांना स्थानबद्ध केले.निवडणूक काळात शहरातील ९९ टक्के परवानाधारी पिस्तूले,रिव्हॉल्वर्स,बंदूका त्यांनी जमा करून घेतल्या.
परवाचे मतदान सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी तीन हजार ९५ पोलिस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.एक हजार होमगार्ड,राज्य राखीव पोलिस दल,सीमा सुरक्षा दल,औद्योगिक सुरक्षा दल तसेच विधानसभा निवडणूक झालेल्या हरियाणातील पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात ८८ लाख ४९ हजार ५९० मतदार,तर आठ हजार ४६२ मतदान केंद्रे असून तेथे साडेबारा पोलिस अधिकारी, कर्मचारी तैनात असणार आहेत.त्यांच्या दिमतीला पाच हजार होमगार्ड,राज्य राखीव दलाच्या पाच पलटणी,तर केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या २९ तुकड्यांचा बंदोबस्ताला देण्यात आल्या आहेत.दरम्यान,दर हजार पुरुषांमागील महिलांचे प्रमाण २०२३ च्या तुलनेत २०२४ला सुधारून ते ९३२ वर गेले आहे. २०२३ ला ते ९१० होते.सव्वादोन हजार जणांनी घरून मतदान सुविधेचा लाभ घेतला,तर साडेपंधरा हजार निवडणूक कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेट केले.उर्वरित बहूतांश मतदार परवा मतदान करणार आहे.