आता बंडखोर बुचकेंचेही ते भाजप करणार का?
उत्तम कुटे
पिंपरीःजुन्नर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे (शिवसेना) बंडखोर अपक्ष उमेदवार शरददादा सोनवणे यांना पक्षाने आज निलंबित केले.पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे ही कारवाई केल्याचे एका ओळीच्या निलंबन पत्रात म्हटले आहे.मतदानाच्या दोन दिवस अगोदर सोनवणेंना हा जोरदार झटका बसल्याने त्याचा परिणाम त्यांच्या मतदानावर होण्याची शक्यता आहे.
सोनवणेंचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ नुकताच मतदारसंघात व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. त्याव्दारे त्यांना पहिला मोठा झटका बसला होता.त्यातून सावरण्याच्या आतच त्यांना पक्षाने आज दुसरा मोठा धक्का दिला.पक्षातून बाहेर काढले.ते जुन्नरच्या रेसमध्ये होते म्हणजे आहेत.दोन्ही राष्ट्रवादीच्या भांडणात (युतीचे अतुल बेनके आणि आघाडीचे सत्यशील शेरकर) त्यांची लॉटरी लागली असती.पण,लागोपाठच्या या दोन धक्यांमुळे ही संधी ते गमावतात की काय असे वाटू लागले आहे.दरम्यान, कथित आक्षेपार्ह व्हिडिओ पक्षश्रेष्ठींकडे गेल्यामुळे ही कारवाई झाल्याचे समजते.कारण त्यांनी बंडखोरी,तर खूप अगोदरच केली होती. अपक्ष म्हणून अर्ज भरून तो कायम ठेवल्यानंतर ५ तारखेला वा त्यानंतरच्या काही दिवसांत कारवाई होणे अपेक्षित होते.पण, प्रचार संपणार त्या दिवशी निवडणुकीच्या शेवटच्या टप्यात ती झाल्याने दरम्यानच्या काळात व्हायरल झालेल्या त्यांच्या त्या कथित व्हिडीओमुळे झाल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
सोनवणेंचं निलंबन झाल्याने आता जुन्नरमधील युतीच्या दुसऱ्या बंडखोर भाजपच्या आशा बुचके यांच्यावर ही कारवाई त्यांचा पक्ष करणार का,याकडे लक्ष लागले आहे.दुसरीकडे भाजपने राज्यातील अशा बंडखोरांवर निलंबनाचा बडगा अगोदरच उगारलेला असला,तरी त्याला जुन्नर,मावळसारखे अपवाद ठेवले होते.पण,आता मित्रपक्षाने ही कारवाई केल्याने त्यांनाही ती करणे भाग पडणार आहे.ती तेथे केली,तर मावळमध्येही त्यांना ती करावी लागणार आहे. कारण तेथे,तर त्यांच्या पक्षाने युतीतील राष्ट्रवादीचे सुनील शेळकेंऐवजी त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीतील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष बापूसाहेब भेगडेंना पाठिंबाच दिला नाही,तर ती त्यांच्या प्रचारातही उतरली आहे.
२०१४ ला सोनवणे हे मनसे कडून राज्यातील एकमेव आमदार म्हणून जुन्नरमधन निवडून आले होते.मात्र,नंतर २०१९ च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी न मिळाल्याने ते शिवसेनेत गेले. तिकडून ते लढले.पण, पराभूत झाले.
आता तेथूनही त्यांना बाहेर काढण्यात आले आहे.त्यामुळे आता त्यांची भूमिका काय राहणार, ते कुठे जाणार याविषयी त्यांची बाजू जाण्यासाठी त्यांच्याशी संपर्क करण्याचा वारंवार प्रयत्न केला.पण, तो झाला नाही.त्यामुळे आता पुन्हा ते स्वगृही परतणार की नवी वाट निवडणार,याकडे लक्ष लागले आहे.