नारायणगाव : (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
जुन्नर तालुक्यातील येडगाव येथील शेतकरी सिताराम नेहरकर यांच्या नेहरकरवाडी येथील शेतात पारनेर तालुक्यातील मेंढपाळ किसन लकडे यांनी मेंढपाळांचा वाडा लावला होता. या मेंढपाळ वाड्या शेजारी मेंढपाळ कुटुंबातील तीन सदस्य उघड्यावर झोपले होते. बुधवारी (दि १३) रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास झोपेत असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील सदस्या अर्चना किसन लकडे (वय १२) या मुलीवर बिबट्याने हल्ला केला. या मुलीच्या आवाजामुळे लकडे कुटुंबातील सदस्य जागे झाले. प्रसंगावधान राखून मेंढपाळ कुटुंबातील सदस्यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. आरडाओरडा झाल्याने अर्चना हिला सोडून बिबट्या निघून गेला. ही मुलगी गंभीर जखमी झाली होती.

बिबट्याच्या नख्या लागल्यामुळे अर्चना हिचा कान,डोळा, डोके, चेहरा आदी भागांवर जखमा झाल्या असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता.अर्चना वर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या मुलीच्या तब्येतीत आता सुधारणा होत असून अतिदक्षता विभागातून जनरल वॉर्डमध्ये तिला दाखल करून तिच्यावर योग्य उपचार सुरू असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ यांनी सांगितले सांगितले
घटनास्थळी बुधवारी सकाळी वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकळ, प्रदीप चव्हाण, निकिता बोटकर, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार,वन परीमंडळ अधिकारी साळुंके,आपदा मित्र सुशांत भुजबळ यांनी भेट दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी सकाळी तातडीने घटनास्थळी परिसरात सहा पिंजरे लावण्यात आले आहेत.

अशाच घटना मागील काही महिन्यात शिरोली बुद्रुक पिंपरी पेंढार व जुन्नर व ओतूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात मेंढपाळ कुटुंबातील तीन वर्षीय मुलीवर, स्थानिक शेतकरी महिलेवर बिबट्याने हल्ले केले होते. या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाले होते.बिबट प्रवण क्षेत्रात मेंढपाळांनी उघड्यावर झोपू नये, तंबूचा वापर करावा आदी सूचना वनविभागाच्या वतीने वारंवार दिल्या जात आहेत.याबाबत जनजागृती केली जात आहे.मात्र,याकडे दुर्लक्ष होत असल्याने बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना होत आहेत.

