लोकसभेला एकच सांगली पॅटर्न गाजला,आता विधानसभेला,तर अनेक आणि विविध पॅटर्न

एकाच नावाचे अनेक उमेदवार रिंगणात उतरल्याचा वेगळाच पॅटर्न,पण ,सगळ्यात भन्नाट ‘रायगड पॅटर्न’!

उत्तम कुटे
पिंपरीः लोकसभेला एकच सांगली पॅटर्न राज्यात गाजला. पण, आता होऊ घातलेल्या विधानसभेत अनेक नवीन आणि विविध पॅटर्न समोर आले आहेत. चिंचवड,जुन्नर,मावळसह अनेक पॅटर्न उदयास आले,तरी त्यात रायगड पॅटर्न हा सगळ्यात भन्नाटच म्हटला पाहिजे.

जुन्नरमध्ये तीन शरद सोनवणे रिंगणात असून तिघेही अपक्ष आहेत. त्यांच्यातील शिंदे शिवसेनेचे शरद सोनवणे बंडखोर असून ते माजी आमदार आहेत.त्यांच्यासह इतर दोन सोनवणे असे तिघेही अपक्ष आहेत.तेथील युतीच्या दुसऱ्या बंडखोर आशा बुचके भाजपच्या आहेत. त्या सलग चौथ्यांदा विधानसभेच्या रिंगणात असून त्यांची पराभवाची हॅटट्रिक झालेली आहे.
असा युतीतील बंडखोरीचा डबल पॅटर्न जुन्नरला आहे.राज्यात इतरत्र अशा बंडखोरांवर निलंबनाची कारवाई होत असताना ती जुन्नरमध्ये,मात्र झालेली नाही.त्यातून दोन्ही बंडखोरांना त्यांच्या पक्षाचेच पाठबळ असल्याची चर्चा आहे.

जुन्नरपेक्षा भलताच वेगळा पॅटर्न मावळमध्ये असून तेथेही भाजपच चर्चेत आहे.कारण त्यांनी चक्क प्रतिस्पर्धी आघाडीतील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना नुसता पाठिंबाच दिला नाही,तर ते त्यांचा हिरीरीने प्रचारही करीत आहेत. नमूद करण्याजोगी बाब म्हणजे आघाडीनेही (राष्ट्रवादी) तेथे आपला उमेदवार न देता भेगडेंनाच पुरस्कृत केले आहे. म्हणजे युती व आघाडीचेही समर्थन असलेले भेगडे हे राज्यातील एकमेव उमेदवार आहेत.तेथेही जुन्नरसारखी भाजपने आपल्या बंडखोर पक्ष पदाधिकाऱ्यांवर कारवाई केलेली नाही.

नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात प्रत्येक जागी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या परिवाराचा एक सदस्य रिंगणात आहे. मंत्री डॉ.गावित भाजपकडून, त्यांचे एक बंधू काँग्रेसकडून , दुसरे बंधू आणि कन्या अपक्ष अशा चारही जागांवर ‘गावितच’ आहेत. रायगड पॅटर्न,तर भन्नाटच आहे.या जिल्ह्यात पनवेल मतदारसंघात 3 प्रशांत ठाकूर विरुद्ध 3 बाळाराम पाटील लढत आहेत. कर्जतला 2 महेंद्र थोरवे विरुद्ध 3 सुधाकर घरे अशी फाईट आहे. उरणमध्ये 2 मनोहर भोईर यांच्या विरोधात 3 प्रीतम म्हात्रे उमेदवार आहेत.तर, अलिबागला 3 महेंद्र दळवी विरुद्ध 3 दिलीप भोईर असा सामना आहे.
या चार ठिकाणी युती,आघाडीच्या महायुतीचे अधिकृत उमेदवारांच्या नावाशी साधर्म्य असलेले असे एकूण 22 उमेदवार शर्यततीत आहेत.यावरून नावात काय आहे,या शेक्सपिअर यांच्या विधानात बदल करून त्यात काय नाही,तर बरेच काही आहे,असेच म्हणण्याची पाळी आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *