शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीतील त्या अॅन्टीक पिस जावा गाडीचे पिंपरी-चिंचवड कनेक्शन
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःमाणसं जपण्यात,हेरण्यात आणि पारखण्यात शरद पवार यांचा मोठा हातखंडा आहे. त्याचा प्रत्यय विधानसभा निवडणूक प्रचाराच्या धामधुमीत शेवटच्या टप्यात पिंपरी-चिंचवडमध्ये गुरुवारी (ता.१४)आला.आपले महाविद्यालयीन जीवनापासूनचे घनिष्ठ मित्र आणि पिंपरी चिंचवडचे माजी महापौर दिवंगत नानासाहेब शितोळे यांच्या पत्नीचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबियाचे पवारांनी आपल्या व्यस्त प्रचारातून वेळ काढत घरी जाऊन सांत्वन केले.

पवार गेले दोन दिवस पूर्वी त्यांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात मोडत असलेल्या उद्योगनगरीत विधानसभा निवडणूक प्रचारासाठी येत आहेत.गुरुवारी,तर चक्क त्यांनी रोड शो केला. जाहीर सभा घेतली.त्यानंतर आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत त्यांनी शितोळेंचे जुन्या सांगवीतील निवासस्थान गाठले.त्या कुटुंबियांचे सांत्वन केले.नानासाहेबांच्या पत्नी अनिता उर्फ नानी यांचे गेल्या महिन्यात २२ तारखेला निधन झाले.त्यामुळे निवडणुकीच्या धामधुमीतूनही पवारांनी जुने ऋनाणुबंध जपले. शितोळे कुटुंबियांच्या घरी भेट देवून त्यांचे सांत्वन केले. यावेळी नानासाहेबांचे चिरंजीव अजय शितोळे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, मुलगी आरती राव, सुना, नातवंडे असा सगळा परिवार उपस्थित होता.

पवार यांनी नानींच्या आजारपणाबद्दल चौकशी केली. नंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला. नानासाहेबांच्या लग्नाला मी धुळे जिल्ह्यात साक्रीला गेलो होतो, याची आठवण त्यांनी सांगितली. नानासाहेब कॉंग्रेसचे शहराध्यक्ष,पक्षनेते असताना याच घरी नगरसेवक पदासाठी मुलाखती, बैठका झाल्या होत्या.त्या जुन्या घरात केलेले बदल त्यांच्या नजरेतून सुटले नाहीत.कसब्यातही नानासाहेबांचा वाडा होता. तेथे आता कोण राहते,अशी विचारणा त्यांनी केली.. मुला-मुलांची व नातवंडाची चौकशी केली. त्यांच्या पहिल्या निवडणुकीत प्रचारासाठी नानासाहेबांनी ‘जावा’मोटारसायकल खरेदी केली होती. नानासाहेबांबरोबर ते व मंत्री रामराजे निबांळकर या बाईकवर फिरले होते. त्यामुळे मी फिरलेलो ती मोटारसायकल आहे का,असे त्यांनी विचारले. त्यावर ‘ॲंटीक पिस’म्हणून ती बंगल्याच्या बाहेर ठेवली असल्याचे शितोळे कुटुंबाने सागितले. त्या मोटारसायकलची त्यांनी जाताना पाहणी केली. ती १९७० ची असल्याचे अतुल शितोळे यांनी म्हणताच लगेच त्यात दुरुस्ती करीत ती १९६७ असल्याचे त्यांनी सांगितले.

