उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःनव्या पॅटर्नमुळे मावळ विधानसभा मतदारसंघातील लढतीकडे यावेळी सर्वांचे लक्ष लागले आहे.कारण तेथे युतीतील राष्ट्रवादीचे बंडखोर बापूसाहेब भेगडे या अपक्ष उमेदवाराला चक्क प्रतिस्पर्धी आघाडीने पाठिंबा दिला,तसाच तो युतीतील भाजपनेही दिल्याने या मावळ पॅटर्नची चर्चा आहे.दरम्यान,या चुरशीच्या व अटीतटीच्या लढतीत आचारसंहिता भंगानंतर आता थेट महिला पत्रकारालाच धमकावल्याचा गुन्हा नुकताच (ता.११)नोंद झाला.
एका मोठ्या मराठी वृत्तवाहिनीच्या मावळचे वार्तांकन करणाऱ्या तीस वर्षीय महिला पत्रकाराला धमकावल्याची ही घटना लोणावळा येथे सोमवारी (ता.११) घडली. त्यांच्या फिर्यादीवरून तळेगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे तसेच संदीप भेगडे आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध लोणावळा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.किशोर भेगडे हे मावळमधील युतीतील राष्ट्रवादीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांचे पुतणे,तर संदीप भेगडे हे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचे चुलत बंधू आहेत.९ तारखेला बापूसाहेब भेगडे आणि त्यांचे प्रतिस्पर्धी युतीतील राष्ट्रवादीचे सुनील शेळके या विद्यमान आमदार व उमेदवार यांच्या गटात लोणावळा येथील राम मंदिरात बाचाबाची झाली होती.त्याची बातमी या महिला पत्रकाराने आपल्या न्यूज चॅनेलवर दिली होती. त्याचा राग मनात धरून अडवून धरीत आमच्याविरुद्ध चुकीची बातमी का दिलीस,वीस तारखेनंतर बघून घेतो,असे आरोपींनी या महिला पत्रकाराला ११ तारखेला लोणावळ्यातच धमकावले.
आतापर्यंत मावळमध्ये लाखो रुपयांची रोकड निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी जप्त केली आहे. महिला मतदारांना वाटण्यासाठी नेण्यात येत असलेल्या साड्याही नुकत्याच त्यांनी पकडल्या.ठरवून दिलेल्या वेळेच्या बाहेर जाऊन प्रचार केल्याने आचारसंहिता भंगाचे गुन्हेही तेथे दाखल झाले आहेत. आता,तर विरोधात बातमी दिली म्हणून महिला पत्रकारालाच धमकावण्यात आल्याने मावळची लढत प्रचाराच्या शेवटच्या टप्यात राहिलेल्या चार दिवसांत आणखी काय वेगळे वळण घेते यामुळे निवडणूक अधिकारीच नाही,तर पोलिसांनाही काळजी वाटू लागली आहे.