गावजत्रा मैदानावरील रेकॉर्ड ब्रेक सभेची गावभर नाही,तर शहरभर चर्चा
उत्तम कुटे
पिंपरीः सध्या भोसरी विधानसभा मतदारसंघात परिवर्तनाची जोरदार चर्चा असून यावेळी ते घडविणार असल्याचा दावा केला जात आहे.काल रात्रीच्या गावजत्रा मैदानातील शरद पवारांच्या रेकॉर्ड ब्रेक सभेने या चर्चेला आणखी जोर आला असून तेथील आघाडीचे (राष्ट्रवादी) उमेदवार अजित गव्हाणेंचे पारडे जड झाल्याचे दिसून आले.दरम्यान,या सभेची गावभर (भोसरी) नाही, तर शहरभर चर्चा झाली.
राजगुरुनगर (खेड) येथील सभा उरकून पवार भोसरीत येणार होते. पण,तेथील सायंकाळच्या सभेत त्यांचे भाषण रात्री सुरु झाले.त्यामुळे भोसरीत यायला त्यांना उशीर झाला.तरीही प्रचंड जनसमुदाय जागचा हालला नाही. रात्री दहा वाजेपर्यंत तसाच तो बसून होता. साडेनऊला पवारांचे भाषण सुरु झाले.वीस मिनिटे त्यांनी आपल्या अभ्यासपूर्ण आणि खुमासदार शैलीत ते केले.कालच्या दिवसातली त्यांची ही शेवटची सातवी सभा होती.तरी त्यांचा उत्साह आणि मिश्किलपणा कायम होता.तो त्यांनी शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांना मारलेल्या टोमण्यातून दिसून आला.या वयातही पवारसाहेब काम करतात,असे अहिर म्हणाले होते.त्यावर ८४ वय म्हणजे म्हातारा झालो का,अजून १६ वर्ष जायची आहेत,असे पवार मिश्कीलपणे म्हणाले.
गावजत्रा मैदान एवढे तुडुंब भरल्याचे प्रथमच पहायला मिळाले.तेथील सभेचे नियोजन काटेकोरपणे स्थानिक वस्ताद, माजी आमदार विलास लांडे पाहत होते. आपल्या साडूच्या मुलाला (अजित गव्हाणे) आमदार करण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न चालले आहेत.ते ज्यांना दैवतासमान मानतात,असे त्यांचे वस्ताद तथा गुरु शरद पवार यांच्या सभेसाठी परवानगीला कसे अडथळे आणले,पण त्यावर कशी मात केली हे त्यांनी सांगितले.लांडेंना मानणारा मोठा मतदार भोसरीत आहेत.तर,दुसरे महावस्ताद पवार यांची,तर राज्यभर पकड आहे. ते जेथे जाऊन सभा घेतात,तेथील वातावरण फिरते,असे दिसते.भोसरीही त्याला काल अपवाद राहिली नाही.कारण राजकारणातील हे दोन्ही वस्ताद एकत्र आले.त्यामुळे भोसरीचंही वारं फिरलं.त्यातून महायुतीचे पैलवान उमेदवार,आमदार महेश लांडगेसमोर आव्हान उभे राहिले.त्यांच्या आमदारकीच्या हॅटट्रिकची वाट बिकट झाली.भाजपुचे भोसरीतील ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे,माजी नगरसेविका सारिका लांडगे,लक्ष्मण सस्ते, ईश्वर ठोंबरे आदींनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने त्यांचे उमेदवार गव्हाणेंचे पारडे जड झाले.त्यामुळे भोसरीत मोठी चर्चा असलेले परिवर्तन घडणार का ते २३ तारखेला कळणार आहे.