महिलांना सध्या संरक्षणाची गरज, लाडकी बहिण योजनेवरून शरद पवारांचा राज्य सरकारला टोला

८४ वय म्हणजे म्हातारा झालो का,भोसरीत केली मिश्कील विचारणा

उत्तम कुटे
पिंपरीःशरद पवार यांची बुधवारी (ता.१३) रात्री भोसरीत जाहीर सभा झाली.ती दिवसातील त्यांची सातवी सभा होती.यावेळी त्यांनी सध्या राज्यात महिलांना संरक्षणाची गरज असल्याचा हल्लाबोल राज्य सरकारवर त्यांच्या लाडकी बहिण योजनेवरून केला.उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरुर लोकसभेच्या आंबेगाव,खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघानंतर भोसरीत त्यांनी राज्य व केंद्र सरकारवर शेलक्या शब्दांत टीका केली.

भोसरीतील गावजत्रा मैदानात झालेल्या या सभेतील वीस मिनिटांचे भाषण पवारांनी दहाला दहा मिनिटे बाकी असताना प्रचार संपण्याच्या वेळेअगोदर संपवले.यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे,आघाडीतील तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते,भोसरी, पिंपरीतील त्यांचे उमेदवार अजित गव्हाणे आणि सुलक्षणा शिलवंत-धर यावेळी उपस्थित होते.या दोघांसह चिंचवडचे त्यांचे उमेदवार राहूल कलाटे अशा शहरातील तिघांनाही विजयी करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.उद्योगनगरीशी असलेल्या घनिष्ठ सबंधांना त्यांनी यावेळी पुन्हा उजाळा दिला. येथे बजाज,टेल्को आदी उद्योग ते हिंजवडीत आय़टी पार्क कसे आणले हे सांगितले.त्यांच्या उपस्थितीत भाजपचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणे,माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते,ईश्वर ठोंबरे,सारिका लांडगे तसेच अमृत सोनवणे,संतोष लांडगे आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेवर ताशेरे ओढताना सध्या महिला,मुलींना संरक्षणाची गरज असल्याचे वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांचे दाखले देत पवारांनी सांगितले.लाडकी बहिण म्हणता आणि दुसरीकडे गेल्या वर्षभरात ८८६ महिला, मुली गायब आहेत,या विरोधाभासाकडे त्यांनी लक्ष वेधले.त्यांचे संरक्षण करण्याची,शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली.आघाडीला राज्याची सत्ता दिली,तर महिलांना संरक्षण देऊ,शेतकऱ्यांना हमीभाव देऊन त्यांच्या आत्महत्या थांबवू, लाखो बेरोजगारांना नोकऱ्या देऊ,अशी खात्री त्यांनी दिली.देशात एक नंबरवरील आपले राज्य सहाव्या क्रमांकावर घसरले असून ते पुन्हा एक नंबरवर आणू,असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या गेल्या पाच वर्षाच्या राजवटीत प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने यावेळी शहरात परिवर्तन होणार असल्याचा दावा गव्हाणेंनी केला.तो करताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळाही सोडला नाही,संतांनाही (संतपीठ) सोडले नाही,अशी तोफ त्यांनी भोसरीतील त्यांचे प्रतिस्पर्धी युतीतील भाजपचे उमेदवार आणि आमदार महेश लांडगेंवर डागली.गेल्या दहा वर्षातील आपल्या कामाचा हिशोब देण्याची मागणी केली.निवडून आल्यानंतर भ्रष्टाचारमुक्त कारभार करु,२४ तास पाणी देऊ असा शब्द त्यांनी दिला.मतदान यंत्रावर आपले नाव एक नंबरला असून आपले कामही एक नंबरच आहे,असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे लांडगेंना टोला मारला.

८४ म्हणजे म्हातारा झालोय का?

पवारसाहेब या वयात काम करतात,असे शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर आपल्या भाषणात यावेळी म्हणाले. .त्यावर ८४ म्हणजे म्हातारा झालोय का,अशी मिश्कील टिपण्णी पवारांनी केली.तसेच अहिरांच्या या वक्तव्यावरून त्यांच्याशी भांडणच झाले असते, असे ते म्हणताच सभेत मोठा हशा पिकला.अजून १६ जायचीत,असे म्हणत त्यांनी सेंच्यूरी मारणार असल्याचे सुचित केले.दरम्यान,युतीच्या बटेंगे तो कटेंगे या नॅरेटीव्हला हम डटेंगे और जितेंगे असे उत्तर अहिर यांनी आपल्या भाषणात दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *