मनसेच्या कांबळेंनी तुतारी फुंकली अन आघा़डीच्या शिलवंतांना आकुर्डीत ताकद मिळाली
उत्तम कुटे
पिंपरीःभोसरी विधानसभा मतदारसंघातील गेल्या टर्ममधील भाजपच्या पाच नगरसेवकांनी आतापर्यंत तुतारी फुंकली असून शरद पवार यांच्या आज सायंकाळच्या भोसरी गावजत्रा मैदानातील सभेत आणखी काहींचे इनकमिंग या पक्षात होणार आहे. त्यापूर्वी चिंचवडमधील भाजपच्या काही माजी नगरसेवकांनीही कमळ सोडून शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे.आता पिंपरी या शहरातील तिसऱ्या राखीव मतदारसंघातूनही राष्ट्रवादीत प्रवेश सुरू झाले आहेत.
पिंपरीत भाजप नाही,तर मनसेतून राष्ट्रवादीत काल प्रवेश झाला.या पक्षाचे के.के.कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रेल्वे इंजिनला रामराम केला.आघाडीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार डॉ.सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या प्रचारासाठी आलेले त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जय़ंत पाटील यांच्या उपस्थितीत कांबळेंनी काल प्रवेश केला.ते पिंपरीतून मनसेकडून इच्छक होते.पण, पिंपरीच नाही,तर शहरातील तीनपैकी एकाही जागी मनसेने उमेदवारच दिला नाही. तसेच तेथील कुठल्या उमेदवाराला पाठिंबाही अद्याप जाहीर केलेला नाही.दरम्यान,तिकिट न मिळाल्याने नाराज होत कांबळेंनी पक्षाला काल रामराम ठोकला अन लगेच राष्ट्रवादीत प्रवेशही केला.भवितव्याचा विचार करून तुतारी फुंकल्याचे त्यांनी आपला आवाजला सांगितले. तसेच मनसेपेक्षा राष्ट्रवादी चांगला पर्याय असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान,कांबळेंच्या प्रवेशामुळे शिलवंत-धर यांना आकुर्डीत आताताकद मिळाली.तेथे त्यांना मते मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यांचे प्रतिस्पर्धी युतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार अण्णा बनसोडेंची आकुर्डी भागात ताकद आहे.मात्र,ते केवळ दहशत व दडपशाहीच्या मार्गातून स्वतःचे खिसे भरण्याचे काम करत होते.त्यांना समाजाची कोणतीही कळकळ नव्हती. आता डॉ. शिलवंत-धर यांच्या माध्यमातून समाजाशी नाळ जोडलेला उमेदवार दिल्याने आपण राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षात सामील होत असल्याचे कांबळे यांनी सांगितले.