मावळात चाललंय काय?लाखो रुपयांनंतर आता सायकली आणि साड्या पकडल्या

सोमाटणे फाटा आणि गाव झालंय जप्ती तथा वाटपाचे मध्यवर्ती ठिकाण

उत्तम कुटे : संपादक
पिंपरीःआगळ्या पॅटर्नमुळे मावळ विधानसभा मतदारसंघातील लढत यावेळी अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी झालेली आहे. तेथे लाखो रुपयानंतर आता साड्याही पकडण्यात आल्या आहेत. सोमाटण्यातच हे घबाड मिळाल्याने ते मावळचे वाटप केंद्र झाल्याची चर्चा रंगली आहे.दरम्यान,आंदर मावळात वाटपासाठी सायकलीही पकडण्यात आल्याची चर्चा असून त्याला पोलिस वा निवडणूक अधिकाऱ्यांनी,मात्र अद्याप दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान,पोलिस आणि निवडणूक आय़ोगाकडून यासंदर्भात खूपच उशीरा माहिती मिळत असल्याची बाब संशयास्पद आहे. साड्या रविवारी (ता.१०) पकडण्यात आल्या असून त्याबाबत दोन दिवसांनी आज (ता.१२)मावळ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाने माहिती दिली.प्रत्येक साडीत तीन हजाराच्या नोटा ठेवण्यात आल्याची चर्चा ऐकायला मिळाली.तर,सोमाटण्यातच रविवारी जप्त करण्यात आलेल्या २७ लाखांच्या रोकडबाबतही त्यांनी अद्याप अधिकृत माहिती दिलेलीच नाही.त्याच दिवशी पकडण्यात आलेल्या साड्यांबाबत,मात्र संक्षिप्त पत्रक काढून त्यांनी त्यात त्रोटक माहिती आज दिली.पांढ-या रंगाच्या महींन्द्रा स्कॉर्पिओतून (-KN-7696)३२ साड्या जप्त करण्यात आल्या.त्या प्रत्य़ेक साडीची किंमत तीनशे रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. गणेश सदाशिव शिंदे (वय ३५, रा. गणेशनगर, शिंदेवस्ती, सोमाटणे,ता. मावळ जि. पुणे)या मोटारचालकाला या साड्यांबाबत समाधानकारक माहिती न देता आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अजित पवार राष्ट्रवादीचे माजी उपसरपंच सचिन शाबू मुर्‍हे (रा. सोमाटणे, चौराईनगर) यांच्या कार्यालयात रविवारीच (ता.१०) ३६ लाख ९० हजार ५०० हजारांची रोकड मिळाली.त्यांच्य पत्नी धनश्री या माजी ग्रामपंचायत सदस्य असून आमदार सुनील शेळके यांच्या पत्नीने सुरू केलेल्या कुलस्वामिनी महिला बचत गटाच्या त्या सदस्या आहेत.मुऱ्हे यांचा जमीन खरेदी-विक्री आणि स्टीलचा व्यवसाय आहे.त्यांना या रोकडबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्याने ती जप्त करून आय़कर विभागाच्या ताब्यात दिली.दरम्यान,ही रक्कम आपल्या व्यवसायाची असल्याचा खुलासा काल मुऱ्हे यांनी केला.मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा असून या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांचे काम करीत आहे,अशी कबुली त्यांनी दिली.दरम्यान,एवढे मोठे घबाड हाती लागले,तरी पोलिस वा निवडणूक अधिकाऱ्यांनीही याबाबत अद्याप अधिकृतपणे माहिती न देण्यामागे काहीतरी,काळेबेरे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.तर,मुऱ्हे यांच्या कार्यालयात सापडलेली ३७ लाखांची रोकड ही शेळकेंचीच असल्याचा आरोप मावळचे माजी आमदार भाजपचे बाळा भेगडे यांनी काल रात्री पत्रकारपरिषद घेऊन केला.त्याबाबत शेळकेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी निवडणूक आय़ोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.यावेळी त्यांनी आंदरमावळात निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी सायकलीही पकडण्यात आल्याची माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *