शेळके जिंकले,तर ते युतीचेच वा भेगडेंनी बाजी मारली,तरी ते ही युतीकडेच येण्याची शक्यता
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःमावळ च्या लढतीकडे यावेळी पूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.कारण तेथे लोकसभेच्या सांगली पॅटर्नपेक्षा वेगळाच पॅटर्न तयार झाला आहे.तेथे संपूर्ण तालुका भाजप,त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी चक्क प्रतिस्पर्धी आघाडीचे (राष्ट्रवादी) बंडखोर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला नाही,तर ते त्यांच्या प्रचारात हिरीरीने उतरलेले आहेत.दरम्यान अशी पक्षविरोधी भूमिका घेणाऱ्यावर भाजपने राज्यभर कारवाईचा बडगा उगारला असला,तरी त्यात त्यांनी मावळला अपवाद केले आहे,हे विशेष.
मावळमध्ये युतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्याविरोधात बंडखोरी करीत रिंगणात उतरलेले भेगडे यांना त्यांच्या पक्षाने निलंबित केले.पण,त्यांना पुरस्कृत करणारे स्थानिक भाजप पदाधिकारी,कार्यकर्त्यांवर,मात्र ती अद्याप केलेली नाही, हे विशेष.त्यामुळे त्यांच्या या बंडाला भाजपचीच सुप्त परवानगी आहे की काय अशी चर्चा सध्या सुरु आहे. पक्षाने कारवाई करण्याअगोदरच मावळातील भाजप पदाधिकाऱ्यांनीच आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.मात्र,ते पक्षाने स्वीकारले नसल्याने वरील चर्चेला बळच मिळाले आहे.यामागे भाजप त्यातही देवेंद्र फडणवीस यांची पट भी मेरी,चित भी मेरी ही खेळी असल्याचे समजते.शेळके जिंकले,तर ते युतीचेच असणार आहेत आणि भेगडे जिंकले,तर ते ही युतीलाच येऊन मिळणार आहेत. कारण ते विजयी झाले,तर त्यात भाजपचाच सिंहाचा वाटा असणार आहे. यावेळी राज्यात भेगडेंसारखे काही बंडखोर अपक्ष हे सत्ता स्थापनेत निर्णायकी भुमिका बजावणार आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मुत्सद्दी फडणवीसांनी आतापासून अशी फिल्डिंग लावली आहे.कारण युती वा आघाडी दोघांनाही यावेळी बहूमत मिळण्याची शक्यता कमी असल्याचा काही मतदानपूर्व चाचण्यांचा अंदाज आहे.
मावळ भाजपचा शेळकेंच्या उमेदवारीलाच विरोध होता व आहे.मुळात ही जागा पक्षाकडे घेऊन ती लढण्याची मागणी त्यांनी केली होती.त्यासाठी माजी आमदार तथा माजी राज्यमंत्री बाळा ऊर्फ संजय भेगडे यांचे उमेदवार म्हणून नाव घेतले जात होते. त्यांचे विधानसभा प्रमुख रविंद्र भेगडे यांनी,तर जोरात तयारी सुरु केली होती.मात्र,जिथे ज्यांचा आमदार ती जागा त्या पक्षाला या युतीतील जागावाटपाच्या सुत्रानुसार मावळ राष्ट्रवादीला सुटली.त्यामुळे दोन्ही भेगडेंनी उमेदवारीची तलवार म्यान केली. मात्र तिसरे भेगडे भाजपने उभे केले. युतीतील राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांना त्यांनी बळ दिले.त्यांची अपक्ष उमेदवारी दाखल करण्यापासून ते आतापर्यंत त्यांच्या प्रचारातही ते त्यांच्याबरोबर राहिले.त्यातून अपक्षाचा मावळ पॅटर्न त्यांनी विधानसभेला तयार केला.त्यांचे प्रतिस्पर्धी आघाडीनेही अपक्ष भेगडेंना पुरस्कृत केले.म्हणजे ही लढत तेथे युती विरुद्ध आघाडी अशी राहिलीच नाही.तर ती युती विरुद्ध युती अशीच झाली आहे.