पैलवानांच्या गावात काय डाव टाकणार?
प्रतिनिधी
भोसरीःराजकारणातील वस्ताद शरद पवार हे पैलवानांचे गाव असलेल्या भोसरीत उद्या (ता.१३) येत आहेत.ते यावेळी काय डाव टाकणार याकडे लक्ष लागले आहे.दरम्यान,संपूर्ण राज्यात सध्या पवारांचा झंजावात सुरु असून त्यांची जिथे सभा होते तिथे वातावरण फिरते आहे. त्यामुळे भोसरीत त्यांची सभा आम्हा कार्यकर्त्यांना ऊर्जा देतानाच भाजपच्या उमेदवाराला गारद केल्याशिवाय राहणार नाही,असा दावा तेथील आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांनी आज केला.
भोसरीतील गाव जत्रा मैदानावर सायंकाळी सहा वाजता गव्हाणेंच्या प्रचारार्थ ही जाहीर सभा होणार आहे.त्यामुळे भोसरीत आघाडीच्या संघर्षाला आणखी बळ मिळेल असा विश्वास गव्हाणे यांनी व्यक्त केला.ते म्हणाले, शहराला दूरदृष्टीने विकासाच्या उंचीवर नेण्याचे काम अण्णासाहेब मगर, प्रा.रामकृष्ण मोरे व त्यानंतर शरद पवार यांनी केले. पवारांनी शहराला उद्योगनगरी म्हणून नावारूपाला आणले. त्यांची शहरात पंधरा वर्षे सत्ता होती. त्या काळात आम्हा सदस्यांना बळ देऊन शहराला मेट्रो सिटीपर्यंत त्यांनी नेले. सुसज्ज रस्ते, उड्डाणपूल, उद्याने, पाण्यासाठी विविध योजना आणल्या. मात्र, गेल्या दहा वर्षात या सर्व नियोजनाची माती करण्याचे काम भाजपने केले.भ्रष्टाचार, दबावतंत्र, ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून केली जाणारी कामे यामुळे शहरातील प्रत्येक कामात गुणवत्ता ढासळली.नागरिकांना पाणी, खड्डे, आरोग्याच्या समस्यांनी घेरले. समाविष्ट गावांत पाणीटंचाईमुळे प्रचंड नाराजी आली.त्याचे रूपांतर परिवर्तनात होत असल्यामुळे भोसरी मतदारसंघात भाजपचा पराभव अटळ आहे असा दावा गव्हाणेंनी केला..