भोसरीत कमळाची घरघर थांबेना,आता ज्येष्ठ नेते बाळासाहेब गव्हाणेंनी सोडला पक्ष

भाजपमधून आऊटगोईंग,तर शरद पवार राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात

आपला आवाज प्रतिनिधी
भोसरी

पिंपरीःगेल्या टर्ममधील भोसरीतील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी पक्षाला आतापर्यंत सो़डचिठ्ठी दिली आहे.त्यातील पाच शरद पवार राष्ट्रवादीत गेले आहेत.त्यानंतर आज तेथील भाजपचे ज्य़ेष्ठ नेते आणि माजी प्रदेश सदस्य बाळासाहेब गव्हाणेंनीही पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला.त्यामुळे आघाडीतील राष्ट्रवादीचे भोसरीतील उमेदवार अजित गव्हाणे यांचे पारडे आणखी जड झाले आहे.कारण पाच दिवसांपूर्वीच (ता.६)भाजपच्या भोसरीतील माजी नगरसेविका सारिका लांडगे यांनी पती संतोष लांडगे व कार्यकर्त्यांसह स्थानिक खासदार डॉ.अमोल कोल्हेंच्या उपस्थितीत तुतारी फुंकली.

कमळ सोडलेले गव्हाणे हे परवा (ता.१३)भोसरीतील गावजत्रा मैदानात होणाऱ्या शरद पवारांच्या जाहीर प्रचार सभेत तुतारी फुंकणार आहेत. १८ वर्षापूर्वी ते राष्ट्रवादीतूनच भाजपमध्ये गेले होते. त्यामुळे ही माझी घरवापसीच आहे,असे ते आपला आवाजशी बोलताना म्हणाले. त्यांच्यासह आणखी काहीजण या सभेत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याने तेथील आघाडी उमेदवाराचे पारडे आणखी जड होण्याची शक्यता आहे.बाळासाहेब गव्हाणेंसह भाजपच्या सर्व नगरसेवकांनी तेथील पक्षाचे आमदार आणि उमेदवार महेश लांडगेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून तो सोडल्याचे सांगितले आहे.

आ.लांडगेंकडून दहा वर्षात केवळ विश्वासघात, दगाबाजी झाल्याचे बाळासाहेब गव्हाणे म्हणाले.त्यांच्या कार्यशैलीमुळे भाजपचा गड कोसळतोय,अशी खंत त्यांनी व्यक्त केली.तसेच आता भोसरीत परिवर्तन अटळ आहे,असे ते म्हणाले.गेल्या दहा वर्षात रेड झोनचा प्रश्न सुटला नाही,जागोजागी टपऱ्यांचे साम्राज्य उभे राहिले, भोसरी गावाला बकालपणा आला, तेथील नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात काय सुरू आहे हे त्यांनाच माहीत नाही,’नाराजीचे हे गळू मोठ्या प्रमाणात ठसठसत आहे’ कधी फुटेल सांगता येत नाही,असा हल्लाबोल त्यांनी केला. जी आश्वासन दिली गेली ती पाळली गेली नाहीत. भोसरीला बकाल करण्याचे काम विद्यमान आमदारांनी केले.म्हणून पक्षातून बाहेर पडत असल्याचे गव्हाणे म्हणाले.त्यांना २०१४ ला भोसरीतून अपक्ष म्हणून नारळ चिन्हावर निवडून आणण्यात आपलाही वाटा होता,असा दावा त्यांनी केला.मात्र,गेल्या दहा वर्षात त्यांनी
केवळ जाहिरातबाजी केली,अशी टीका त्यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *