आपला आवाज प्रतिनिधी
पिंपरीःजुन्नर विधानसभा मतदारसंघात ११ उमेदवार रिंगणात असले,तरी तेथील लढत आघाडी (राष्ट्रवादीचे सत्यशील शेरकर) विरुद्ध युती (राष्ट्रवादीचे अतुल बेनके) अशीच होणार आहे.त्यात अपक्ष उमेदवार सुखदेव खरात यांनी काल बेनकेंना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे पारडे किंचीत का होईना तुलनेने जड झाले आहे.युतीतील दोन्ही बंडखोरांमुळे (भाजपच्या आशा बुचके आणि शिवसेनेचे शरद सोनवणे) या लढतीला चौरंगी किनार मिळाली आहे.
गेल्यावेळी २०१९ ला बेनके,सोनवणे आणि बुचके अशा तिरंगी लढतीत बेनके विजयी नऊ हजार मतांनी झाले.बुचके यांना तीन नंबरची १७ हजार मते मिळाली होती. तर, सोनवणे हे दोन नंबरवर राहिले होते.हे तिघेही पुन्हा रिंगणात आहेत. फक्त गेल्यावेळी सोनवणे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार होते.तर,यावेळी ते आणि गेल्यावेळीही अपक्षच असलेल्या बुचके असे दोघेही पुन्हा अपक्षच आहेत. बुचके यांची जुन्नरला पराभवाची हॅटट्रिक झाली असून त्या चौथ्यांदा निवडणूक लढवीत आहेत. २०१९ ला ११ उमेदवार असताना तिरंगी लढत झाली होती.यावेळी २०२४ ला ही ११ च उमेदवार शर्यतीत असून लढत,मात्र चौरंगी आहे.
दरम्यान, अपक्ष खरात यांनी बेनकेंना समर्थनाचे पत्र काल दिले.एकाच गावचे असल्याने बेनकेंना पाठिंबा दिला.तसेच त्यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांमुळे प्रभावित होऊन त्यांना समर्थन दिल्याचेही खरात यांनी म्हटले आहे.सुसंस्कृत, उच्चशिक्षित,चारित्र्यसंपन्न अशा पाणीदार आमदार बेनकेंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जुन्नरवासियांना केले आहे. दरम्यान, खरातांनी दिलेल्या या पाठिंब्याबद्दल त्यांचे बेनकेंनी लगेच आभार मानले. शिवजन्मभूमीच्या विकासासाठी एकत्र काम करू,अशी साद त्यांनी या समर्थनावर घातली.