बालेकिल्ला राखण्यासाठी अनेक ठिकाणी दोन राष्ट्रवादीच झुंजणार
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपुणे जिल्हा हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड होता व आहे. पण पक्ष फुटल्याने त्याला आता तडे गेले आहेत.त्यानंतर तो आपल्याच मागे आहे हे शरद पवार राष्ट्रवादीने लोकसभेला दाखवून दिले.मात्र, विधानसभेला तो आपल्याकडे खेचण्याचे जोरदार प्रयत्न अजित पवार राष्ट्रवादीने सुरु केले आहेत.त्यातून पिंपरी,वडगाव शेरीसारख्या पिंपरी-चिचवड,पुणे शहरातील मतदारसंघासह जुन्नर,आंबेगाव,शिरुर आदी जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ठिकाणीही दोन्ही राष्ट्रवादी झुंजत आहेत.त्यातील कुठल्या राष्ट्रवादीला जिल्हा हा आपला मानतो हे २३ तारखेला कळणार आहे.
लोकसभेला थोरल्या व धाकट्या अशा दोन्ही पवारांनी अत्यंत प्रतिष्ठेच्या केलेल्या पुणे जिल्ह्यातील शिरुर आणि बारामती या दोन मतदारसंघात मोठ्या साहबांची सरशी झाली. बारामतीत त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी धाकल्या पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला.तर,तू कसा निवडून येतो,ते पहातो असे पुरंदरच्या विजय शिवतारेंना गेल्यावेळी विधानसभेला दिले,तसे आव्हान लोकसभेला शिरुरमध्ये डॉ. अमोल कोल्हेंना दिलेल्या अजितदादांना ते पेललेच नाही. कोल्हे सलग दुसऱ्यांदा निवडून आले. मावळात पुन्हा युतीतील शिवसेना,तर पुण्यात भाजपचा खासदार झाला.पण,चारपैकी दोन जागा जिंकून शरद पवारांनी पुणे जिल्हा हा आपला गड शाबूत असल्याचे सिद्ध केले.
आता विधानसभेला मोठ्या पवारांच्या या गडाला पुन्हा सुरुंग लावण्यााचा प्रयत्न छोट्या पवारांनी सुरु केला आहे.पण ते दिसते तेवढे सोपे नाही. कारण आपली साथ दिलेल्या पुणे जिल्ह्यातील बहूतांश आमदारांना पुन्हा निवडून आणण्याचे शिवधनुष्य त्यांना पेलायचे आहे.दुसरीकडे हा आपलाच बालेकिल्ला आहे,हे मोठ्या पवारांनाही दाखवून द्यायचे आहे.त्यासाठी त्यांनी काही ठिकाणी अचूक डाव टाकले आहेत. म्हणजे खेडला अजितदादांचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते-पाटील यांच्याविरुद्ध ही जागा सर्व्हेत आघाडी घेतलेल्या शिवसेनेला सोडून त्यांची नाराजी त्यांनी दूर केली आहे. तसेच जुन्नरला त्यांनी आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात आय़त्यावेळी कॉंग्रेसचे स्थानिक मातब्बर शेरकर घराण्यातील सत्यशील शेरकरांना संधी दिली आहे.या दोन्ही ठिकाणी थेट लढत होत आहे.भोसरीतही त्यांनी अजितदादांचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणेंना फोडून त्यांना तिकिट देण्याची खेळी केली आहे.पिंपरीतील त्यांचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याविरुद्ध नवा,अभ्यासू आणि तरुण चेहरा सुलक्षणा शिलवंत-धर यांच्या रुपाने देऊन पिंपरीकरांना परिवर्तनाची संधी दिली आहे.आंबेगाव-शिरुरमध्येही आपली साथ सोडून गेलेले दिलीप वळसे-पाटील यांच्याविरोधात त्यांचेच शिष्य देवदत्त निकम यांना रिंगणात उतरवले आहे.त्यातून पिंपरी,आंबेगाव,जुन्नर आणि शिरुर-हवेलीत दोन्ही राष्ट्रवादीच भिडणार आहेत.शिरुर लोकसभेतील पाचपैकी फक्त शिरुरचे अशोक पवार हे एकमेव आमदार शरद पवारांसोबत राहिले.म्हणून त्यांना पुन्हा संधी देण्यात आली.त्यांच्याविरुद्ध शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना यांना ऐनवेळी आय़ात करीत अजितदादांनी तेथे मोठ्या साहेबांची खेळी त्यांच्यावरच उलटवण्याचा डाव टाकला आहे.
उद्योगनगरीत पिंपरीच्या जोडीने भोसरीतही आघाडी (गव्हाणे) विरुद्ध युती (भाजपचे महेश लांडगे) दुरंगीच लढत होत आहे. तशी ती जिल्ह्यात १३ ठिकाणी युती विरुद्ध आघाडीत होत आहे. फक्त दोन्हीमध्ये बंडखोरी झाल्याने बाकीच्या आठ ठिकाणी ती तिरंगी,चौरंगी होत आहे.जुन्नरला युतीतील भाजपच्या आशा बुचके आणि शिवसेनेचे शरद सोनवणे यांनी बंडखोरी केल्याने तेथे चौरंगी सामना आहे.चिंचवडलाही युतीतील राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर यांनी बंड केल्याने तेथे युती (भाजपचे शंकर जगताप),आघाडी (राष्ट्रवादीचे राहूल कलाटे) असा तो तिरंगी होत आहे.लोकसभेला बारामतीत भावजय नणंद अशी लढाई झाली होती.यावेळी ती चुलते-पुतणे (युतीतील राष्ट्रवादीचे अजित पवार विरुद्ध आघाडीच्या राष्ट्रवादीचे युगेंद्र पवार) अशी होणार आहे.मावळमध्ये,तर लोकसभेच्या सांगली पॅटर्नपेक्षाही वेगळाच विधानसभेला यावेळी आहे.तेथे युतीतील राष्ट्रवादीचे बंडखोर बापू भेगडे यांना युतीतीलच भाजपने पाठिंबा देत त्यांचा प्रचारही सुरु केला आहे.तर,प्रतिस्पर्धी आघाडीने तेथे आपला उमेदवार न देता भेगडेंना समर्थन दिले आहे.