सोमाटणे टोलनाक्यावर दोन मोटारीतून जप्त केली पावणेतीन लाखाची रोकड
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाला मर्यादा असून आयकर विभागाचे त्यावर बारीक लक्ष असते. म्हणून या काळात मोठ्या प्रमाणात काळ्या पैशाचा वापर होतो.त्याची वाहतूक होते.पिंपरी-चिंचवड पोलिसांनी गेल्या दोन दिवसात तीन घटनात तब्बल ६४ लाख ३५ हजार २३० रुपयांची रोकड पकडली.
पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्यावर काल संध्याकाळी दोन तासांच्या अवधीत दोन मोटारीतून दोन लाख ८५ हजार २३० रुपये जप्त करण्यात आले. स्थानिक तळेगाव दाभाडे पोलिस आणि गुन्हे शाखा युनीट पाचने ही कामगिरी केली. .निवडणुकीनिमित्त या टोलनाक्यावर २४ तास पोलिस तैनात आहेत.तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्याच वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावार आणि गुन्हे शाखा युनीट पाचचे पोलिस उपनिरीक्षक राहूल कोळी व पथकाने पहिली कारवाई केली. त्यांच्या नाकाबंदीत देहूरोडकडून तळेगाव दाभाडेच्या दिशेने येणाऱ्या एका पांढऱ्या मोटारीत (एमएच-१४-एचक्यू-८९००)दोन लाखाची रोकड मिळाली.त्या मोटारीत विजय मारुती मांडूळे (वय २९,रा.सध्या कामशेत,ता.मावळ) आणि संकेत भाऊ वाडेकर (वय २४,रा.तुंगार्ली,लोणावळा)यांना या पैशाबाबत समाधानकारक खुलासा करता आली नाही,वा त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे दाखवता न आल्याने ती जप्त करण्यात आली.
दुसऱ्या घटनेत रात्री पावणेनऊ वाजता याच टोलनाक्यावरील नाकाबंदीत एका संशयित मोटारीतून (एमएच-१४-एफएस-९४००) ८५ हजार २३० रुपये तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाले.मोटारीतील अक्षय रामदास आटोळे (वय २९, रा.सांगवी) याला ही रक्कम कोठून आणली ते सांगता न आल्याने ती जप्त करण्यात आली.अशा प्रकरणात गुन्हा दाखल न करता फक्त पोलिस ठाण्यात त्याची नोंद (स्टेशन डायरी)केली जाते. ही रोकड मिळालेल्या व्यक्तींना ती कोठून कशासाठी घेऊन चालले होते,याचे पुरावे सादर करण्यास सांगितले जाते.ते त्यांनी दिले नाही,तर आय़कर विभागाला त्याबाबत कळवून पुढील तपास त्यांच्याकडे सोपविला जातो,असे रायण्णावार यांनी आपला आवाजला सांगितले.तसेच अशा घटनातील पैसे मिळालेली वाहने जप्त केली जात नसून व्यक्तींनाही अटक होत नसल्याची माहिती त्यांनी दिली.
काल सकाळी ११ वाजता चिंचवड येथील चापेकर चौकात एका मोटारीतून ३५ लाख ११ हजार २२० रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले होते.तर, परवा रात्री चाकण येथे भरारी पथकाने एका मोटारीतून ३६ लाख ३९ हजार रुपये जप्त केले.वरील चारही घटनांतील रोकड ही विधानसभा निवडणुकीतील वापरासाठी घेऊन जाण्यात येत असल्याचा संशय आहे. दरम्यान,एरव्ही अशा घटना होत असल्याचे उघडकीस येत नाही. त्यातून निवडणूक काळातील या प्रकरणात मिळून येत असलेली रोकड ही निवडणुकीतील वापरासाठीचा काळा पैसा असल्याला दुजोरा मिळत आहे.