लक्ष्मण जगतापांचे राहिलेले कार्य पूर्ण करण्यासाठीच शंकर जगतापांना उमेदवारी
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःभाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चिंचवडमधील युतीतील भाजप उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा वाकड येथे आज झाली. त्यात त्यांनी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर बोचरी टीका केली. शरद पवार हे अलिकडे राज्यात सुरु झालेल्या खोट्या नॅरेटीव्ह फॅक्टरीचे मालक,तर सुळे या संचालक असल्याचे ते म्हणाले.
चारशेपेक्षा जास्त जागा जिंकून भाजप संविधान बदलणार असल्याचा प्रचार विरोधी पक्षांनी केल्याने त्याचा मोठा फटका युती तथा भाजपला महाराष्ट्रात लोकसभेला बसला.त्यामुळे हा प्रचार तथा खोटा नॅरेटीव्ह विधानसभेलाही धोकादायक ठरण्याची शक्यता गृहित धरून भाजपने त्याचा समाचार घेणे सुरु केले आहे. शहरातील पहिल्याच उमेदवारासाठी त्यांच्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्याची झालेली पहिलीच सभा ही फडणवीसांची ठरली.यावेळी स्थानिक खासदार शिंदे शिवसेनेचे श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अमित गोरखे, अश्विनी जगताप,उमेदवार शंकर जगताप यांच्यासह युतीतील पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.राज्यभरातील आजच्या झंझावाती दौऱ्यातील फडणवीसांची ही शेवटची सभा होती.त्यात त्यांनी आपल्या ३५ मिनिटांच्या भाषणात खासदार पवार बापेलेकीला लक्ष्य केले.
भारतमाता की जय,छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय आणि जय भवानी…या नेहमीच्या वाक्यांनी फडणवीसांनी आपल्या भाषणाची सुरवात उद्योगनगरीतही केली. लक्ष्मण जगताप,अश्विनी जगताप यांच्यावर जो विश्वास दाखवला तोच शंकर जगतापांवर दाखवा,तुमच्या सर्व आशाआकांक्षा पूर्ण करतो,असा शब्द त्यांनी चिंचवडकरांना यावेळी दिला. २३ तारखेला शंकर जगताप हेच आमदार होतील, असा मोठा दावाही त्यांनी केला.त्यांना निवडून आणण्याचा चंग बांधलेले नाना काटे,शत्रूघ्न काटे, अनुप मोरे,संदीप कस्पटे,संतोष कलाटे,महेश कुलकर्णी आदींचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.ही नावे वाचताना एखादे राहिले असेल,तर ते लिहून देणाऱ्यांची चूक आहे,असे ते म्हणताच मोठा हशा झाला.त्यातही उमेदवारी मागे घेतलेल्या नाना काटेंचे त्यांनी खास आभार मानले.त्यांना शहरातील राष्ट्रवादीचे पिंपरीतील उमेदवार अण्णा बनसोडे,मावळातील सुनील शेळकेंसह पुणे जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी जीवाचे रान करू,असा शब्द दिला. आज लक्ष्मण जगतापांची खूप आठवण येते असे सांगत त्यांचे राहिलेले कार्य पुढे नेण्याकरिताच शंकर जगतापांना उमेदवारी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला चाललेत असा फेक नॅरेटीव्ह शरद पवारांनी आता सूरु केला असून ते या नॅरेटीव्ह फॅक्टरीचे मालक,तर त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे या संचालक असल्याचा हल्लाबोल फडणवीसांनी केला.हा नॅरेटीव्ह कसा चुकीचा आहे, ,हे ही त्यांनी यावेळी सांगितले.त्याचवेळी देशातील सर्वाधिक गुंतवणूक आपल्या राज्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.आघाडी सरकारच्या काळात त्यातील गेलेला राज्याचा अव्वल नंबर युतीचे सरकार येताच पुन्हा मिळवल्याचा दावा त्यांनी केला.आय़टी पार्क,हिंजवडीतील १६ उद्योग गुजरातला गेल्याचा सुळेंचा दावाही त्यांनी खोडला.त्यातील १३ उद्योग आघाडी सरकारच्या काळात गेले,तर त्यातील तीन उद्योग आमच्या सत्ताकाळात गेले,पण महाराष्ट्रातच नाशिकला,असे ते म्हणाले.त्यामुळे हे फेक नॅरेटीव्ह बंद करावे,असे आवाहन त्यांनी केले.शरद पवारांच्या नेतृत्वात पुणे जिल्ह्यात ५० वर्षात पायाभूत सुविधा का निर्माण झाल्या नाहीत,असा सवाल त्यांनी केला.लाडक्या बहिणींचे आम्ही सख्खे भाऊ असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला न्यायालयात आव्हान देणारे आघाडीतले सावत्र भाऊ आहेत,असा टोला त्यांनी लगावला.तसेच ही योजना आघाडी सरकार आले,तर बंद करतील,अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.