भोसरीत महेश लांडगेंना धक्यावर धक्के, सहाव्या नगरसेवकाने भाजप सोडला..

भाजपची भोसरीतील गळती थांबण्याचे नाव घेईना,माजी नगरसेविका सारिका लांडगेंचा पक्षाला रामराम

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःपिंपरी-चिंचवड महापालिकेतील भोसरीतील भाजपच्या माजी नगरसेविका सारिका लांडगे यांनी पक्षाला आज रामराम करीत शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.त्यांनी पती संतोष लांडगे व कार्यकर्त्यासह विधानसभा ऐन निवडणुकीत पक्ष सोडणे हा भोसरीतील भाजपचे म्हणजे युतीचे उमेदवार महेश लांडगे यांना जोरदार धक्का आहे.मात्र,तीच बाब तेथील आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांना मोठा दिलासा ठरला आहे.

आतापर्यंत गेल्या पंचवार्षिकमधील भोसरीतील भाजपच्या सहा माजी नगरसेवकांनी पक्षाला सो़डचिठ्ठी दिली आहे.त्यात दोन महिला व चार पुरुष आहेत. सहापैकी पाच नगरसेवक हे शरद पवार राष्ट्रवादीत गेल्याने गव्हाणेंचे पार जड झाले आहे.यापूर्वी उच्चशिक्षित माजी नगरसेविका प्रियंका बारसे यांनी कमळ सोडून हाती तुतारी घेतली.तर,गेल्यावेळी २०१७ ला बिनविरोध निवडून आलेले भाजपचे रवी लांडगे यांनी सारिका लांडगे अगोदर भाजप सोडून ठाकरे शिवसेनेत प्रवेश केलेला आहे.संजय नेवाळेंनी भाजपला भोसरीत भगदाड पाडण्यास सुरवात केली.त्यांनी प्रथम हा पक्ष सोडला.त्यानंतर वसंत बोराटे,प्रियंका बारसे,लक्ष्मण सस्ते,रवी लांडगे,तर आता सारिका लांडगेंनी तो सोडला.ते सर्व गव्हाणेंच्या प्रचारात हिरीरीने सहभागीही झाले आहेत.

शिरुरचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आज शहरातील तिन्ही मतदारसंघातील आघाडी उमेदवारांच्या प्रचारासाठी आले होते.त्यावेळी त्यांच्या उपस्थितीत गव्हाणेंच्या प्रचारसभेत सारिका लांडगेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अगोदरच्या सर्व भाजपच्या माजी नगरसेवकांनी भोसरीचे पक्षाचे आमदार आणि उमेदवार महेश लांडगेंच्या कार्यपद्धतीला कंटाळून पक्ष सोडल्य़ाचे सांगितले आहे.आपल्या कामाचे श्रेय आमदारच घेत असल्याचे पक्ष सोडलेल्या भाजप नगरसेवकांचे म्हणणे आहे. सत्तेत असूनही कामे न झाल्याने पक्ष सोडल्याचे सारिका लांडगे म्हणाल्या.तर, महापालिका व राज्यातही सत्ता असल्याचा फायदा कामे होण्यासाठी झाला नसल्याचे त्यांचे पती संतोष लांडगे यांनी सांगितले.आणखी दोन-तीन नगरसेवक भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.त्याला दुजोरा देणारे संकेत यापूर्वीच मिळाले आहेत.पक्ष सोडण्याच्या तयारीत असलेल्या एका भाजप नगरसेवकाची मनधरणी करून त्याला विधानसभा निवडणूक होईपर्यंत थांबविण्यात तूर्त यश आले आहे.त्यामुळे ती संपल्यावर ते सुद्धा पक्षाला रामराम करू शकतात.जर,राज्यात सत्ता बदल झाला,तर त्याला आणखी वेगही मिळू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *