आघाडीच्या वज्रमूठीने अजित गव्हाणेंचे भोसरीत पारडे झाले जड

वस्ताद लांडे आणि आक्रमक उबाळे उतरल्या प्रचाराच्या मैदानात

उत्तम कुटे,संपादक

पिंपरीःअर्ज माघारीच्या दिवसापर्यत असलेले थोडेसे रुसवेफुगवे गेल्या दोन दिवसांत गेल्याने भोसरीत आघाडीची वज्रमूठ आता झाली आहे. तेथील वस्ताद आणि प्रथम आमदार विलास लांडे यांनी स्वत आघाडीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अजित गव्हाणे यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली असून शिवसेनेच्या पिंपरी-चिंचवड महापालिकेतील आक्रममक माजी गटनेत्या सुलभा उबाळे आणि त्यांच्याच पक्षाचा तरुण चेहरा रवी लांडगेंची साथ त्यांना मिळाल्याने आघाडी तेथे युतीवर वरचढ झाल्याचे दिसून आले आहे.

गव्हाणेंसारखेच लांडेही वादातीत,शांत आणि संयमी व्यक्तीमत्व असल्याने त्यांना मानणारा मोठा मतदार आहे.लांडे,हे तर अत्यंत धोरणी, आणि हुषार राजकारणी असून त्यांचे शिक्षण आणि उद्योग व्यवसायाचेही मोठे जाळे आहे.त्याचा फायदाही उमेदवार आणि त्यांच्या साडूचा मुलगा गव्हाणेंना होऊ शकतो.त्यांच्या पत्नी महापौर,तर मुलगा हा नगरसेवक राहिलेला असून त्यांना मानणाऱ्या मतदारांचीही मते गव्हाणेंच्या पारड्यातच जाणार आहे.गव्हाणे चार टर्म नगरसेवक,स्थायी समिती सभापती आणि नंतर पक्षाचे शहराध्यक्ष राहिलेले असल्याने त्यांना पूर्ण भोसरीच नाही,तर शहरही चांगलेच ओळखत आहे.त्यांच्या व लांडेंच्या या ताकदीला यमुनानगर,निगडी भागातच नाही,तर मतदारसंघातील मोठ्या ताकदीच्या उबाळेंची साथ मिळाल्याने ती दुप्पट झाली आहे.त्या भोसरी लढलेल्या असून महिलावर्गात त्यांची मोठी क्रेझ आहे.

मोशी येथे घेतलेल्या सभेत उबाळेंनी प्रतिस्पर्धी उमेदवार युतीतील भाजपचे महेश लांडगे यांच्यावर काल सडकून टीका केली. मोशीचे ग्रामदैवत नागेश्वरासमोर शड्डू ठोकणारा (लांडगे)की त्याच्यासमोर दंडवट घालणारा (गव्हाणे)नेता तुम्हाला पाहिजे, अशी साद त्यांनी मोशीकरांना घातली.त्यानंतर लांडेंनी आज उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत गव्हाणेंना विजयी करतील,असे चिखली-टाळगाव परिसरातील रॅलीत सांगितले.यावेळी त्यांना मोठा प्रतिसाद मिळाला.तर,गव्हाणेंना निवडून आणण्यासाठी आघाडीतील तिसरा मित्र पक्ष कॉंग्रेसनेही कंबर कसली आहे. भोसरीतून माघार घेतलेले व गतवेळी २०१७ ला बिनविरोध निवडून आलेले माजी नगरसेवक रवी लांडगे यांचीही साथ आता मिळाली आहे.त्यामुळे भोसरीत आघाडीची वज्रमूठ बळकट होऊन गव्हाणेंच्या मागे मोठी शक्ती उभी राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *