पुणेकर आयपीएस फणसळकर सिनिअर असूनही महासंचालक होण्याची त्यांची संधी का हुकली
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःकॉंग्रेसच्या जोरदार आक्षेपामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने १९८८ च्या आयपीएस बॅचच्या महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालक (डीजीपी)रश्मी शुक्ला यांची काल बदली केली.त्यानंतर लगेच आयोगाने १९९० च्या आयपीएस बॅचचे संजय वर्मा यांची डीजीपी म्हणून आज नेमणूक केली.पण,ती करताना १९८९ च्या आयपीएस बॅचचे मुंबईचे पोलिस आयुक्त (सीपी)विवेक फणसळकर हे सिनिअर असूनही त्यांना,मात्र डावलले.त्यामुळे त्याची मुंबईच नाही,तर राज्य पोलिस दलातही मोठी चर्चा आहे.
राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून ओळख असलेल्या शुक्ला या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या (एसआय़डी) आय़ुक्त असताना त्यांनी आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केले.त्यामुळे त्या मोठ्या वादात सापडल्या होत्या. दरम्यान,राज्यात आघाडी सरकार येताच त्यांनी केंद्रात प्रतिनियुक्तीवर (डेप्यूटेशन) जाणे पसंत केले.पण, युतीचे सरकार येताच त्या पुन्हा राज्यात आल्या.म्हणजे फडणवीसांनी त्यांना परत आणले. राज्याचे डीजीपी केले.निवृत्त होताच दोन वर्षांची मुदतवाढही दिली.मात्र, निवडणूक काळात त्यांच्या डीजीपी राहण्यावर कॉंग्रेससह विरोधी पक्षांनी जोरदार आक्षेप घेत आयोगाकडे तक्रार केली.त्याची दखल घेत आयोगाने काल त्यांची तातडीने बदली करण्याचा आदेश दिला.तसेच तीन सिनिअर अधिकाऱ्यांची नावे नवीन डीजीपीसाठी मागवली.
सध्या राज्यात फणसळकर हे शुक्लानंतर सिनिअर मोस्ट आय़पीएस अधिकारी आहेत.तर, डीजीपी म्हणून नियुक्ती झालेले वर्मा हे त्यांना एक वर्षाने ज्युनिअर आहेत.सध्या ते कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक आहेत.या दोघांसह पुण्यात सीपी राहिलेले १९९२ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी रितेश कुमार अशा तिघांची नावे राज्याच्या मुख्य सचिवांनी आयोगाला दिली होती. त्यातील वर्मा हे फणसळकरांना ज्युनिअर असून सुद्धा त्यांची नियुक्ती डीजीपी म्हणूने करण्यात आली. कारण डीजीपी पदी नियुक्ती होण्यासाठी रिटायर व्हायला किमान सहा महिन्यांचा कालावधी बाकी असणे हा निकष आहे.फणसळकरांचा तो पाच महिने २५ दिवसच शिल्लक आहे.ते येत्या ३० एप्रिलला रिटायर होत आहेत.म्हणजे त्यांचा कार्यकाल हा सहा महिन्यांपेक्षा फक्त पाचच दिवस कमी शिल्लक होता. म्हणून त्यांना डावलून एप्रिल २०२८ ला रिटायर होणाऱ्या वर्मांची डीजीपी म्हणून नियुक्ती झाली.तर,अत्यंत प्रामाणिक,साध्या आणि शिस्तप्रिय अशा फणसळकर या पुणेकर आय़पीएसची ही संधी हुकली.तसं त्यांनी प्रभारी डीजीपी म्हणून काम पाहिलेले आहे.तसेच मुंबईचा सीपी हा पुढे डीजीपी होतो,या प्रथेला,मात्र यामुळे ब्रेक बसला.मात्र,अनेक सिनिअर आयपीएसची इच्छा ही डीजीपी नाही,तर मुंबईचे सीपी बनण्याचीच असते. कारण त्या पोस्टला तेवढे वलय आहे.
दरम्यान,वर्मा यांची आयोगाने नेमणूक केली आहे.त्यामुळे नवीन आलेले राज्य सरकार त्यांना त्या पदावर ते रिटायर होईपर्यंत ठेवेल की नाही,याविषयी शंका आहे.सध्या ते कायदा व तांत्रिक विभागाचे संचालक आहेत. युती सरकार पुन्हा सत्तेत आले,तर ते आपल्या मर्जीतील अधिकारी डीजीपी म्हणून नियुक्त करण्याची शक्यता आहे. तसेच आघाडीची सत्ता आली,तरी ते सुद्धा आपल्या मर्जीतील अधिकारी सेवाज्येष्ठता डावलून आणू शकतात.त्यातून वर्मा हे राज्यातील सर्वोच्च पदी औटघटकेचे की की रिटायर होईपर्यंत राहतात,हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.