उत्तर पुणे जिल्ह्यात पाच जागांसाठी ५६ रिंगणात,चार ठिकाणी थेट लढती

पुणे जिल्ह्यात २१ जागांसाठी ३०४ जण  रिंगणात,सर्वाधिक २४ उमेदवार इंदापूरात

उत्तम कुटे
पिंपरीः अर्ज माघारीनंतर सोमवारी (ता.४) राज्याच्या २८८ विधानसभा मतदारसंघातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले.तेथे ४ हजार १४०,तर पुणे जिल्ह्यातील २१ जागांसाठी ३०४ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.तर, उत्तर पुणे जिल्ह्यातील (शिरुर लोकसभा मतदारसंघ) पाच जांगाकरिता ५६ जण मैदानात उतरले आहेत.

राज्यात सात हजार ७८ पैकी दोन हजार ९३८, तर
पुणे जिल्ह्यातील ४८२ पैकी १७८ जणांनी सोमवारी माघार घेतली. त्यामुळे ३०४ उमेदवार शर्यतीत राहिले.त्यात इंदापूरनंतर सर्वाधिक २३ उमेदवार बारामतीत आहेत.तर,सर्वात कमी म्हणजे प्रत्येकी सहा हे मावळ आणि भोरमध्ये आहेत.उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात कमी दहा उमेदवार हे आंबेगावला,तर त्यानंतर प्रत्य़ेकी ११ शिरूर, जुन्नर,भोसरीतील आहेत.तेथे सर्वात जास्त १३ उमेदवार खेडमध्ये आहेत.जुन्नरचा अपवाद वगळता उत्तर पुणे जिल्ह्यात आघाडी विरुद्ध युती अशाच थेट लढती होत आहेत. भोसरी आणि खेडचा अपवाद वगळता इतर तीन ठिकाणी त्या दोन्ही राष्ट्रवादीतच होत आहेत.

जुन्नरला ११ उमेदवार रिंगणात असून तेथे चौरंगी लढत होत आहे. युतीचे विद्यमान आमदार (राष्ट्रवादी)अतुल बेनके, आघाडीचे (राष्ट्रवादी) सत्यशील शेरकर,युतीतील भाजपच्या बंडखोर आशा बुचके आणि माजी आमदार शरददादादा सोनवणे अशा चौघांतच ती होत आहे. तर,आंबेगाव तालुक्यात हा सामना युतीतील राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि आघा़डीतील राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांच्यात रंगणार आहे. तेथे सलग सातवेळा वळसे हे आमदार असून आठव्यांदाही ते निवडून येतात,का याकडे लक्ष लागले आहे.शिरुरला युतीचे (राष्ट्रवादी) ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके आणि आघाडीचे (राष्ट्रवादी) आमदार अशोक पवार अशी दोन्ही राष्ट्रवादीतच लढाई होत आहे.खेडला,मात्र युतीचे (राष्ट्रवादी)आमदार दिलीप मोहिते-पाटील) यांचा सामना आघाडीच्या (शिवसेना) बाबाजी काळे यांच्याशी होणार आहे. भोसरीतही तो युतीचे (भाजप) आमदार महेश लांडगे विरुद्ध आघाडीचे (राष्ट्रवादी) अजित गव्हाणे असा होत आहे.तेथे लांडगे हे आमदारकीच्या हॅटट्रिकवर असून ती चुकविण्याचा गव्हाणेंचा बेत आहे.