ठाकरे शिवसेनेच्या लांडगे,चाबुकस्वारांची माघार,काटे,भोईराकडे आता लक्ष
उत्तम कुटे
पिंपरीःविधानसभा निवडणुकीतील अर्ज माघारीचा उद्या शेवटचा दिवस असल्याने बंड थंड करण्याचे निकराचे प्रयत्न युती व आघाडीने सुरु केले आहेत.त्यासाठी भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात कालपासून तळ ठोकून आहेत.तर,आज आघाडीतील राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर हे उद्योगनगरीत त्यासाठी आले. त्यांच्यामुळे पिंपरी व भोसरीतील शिवसेनेचे बंड थंड झाले.
भोसरीतील शिवसेनेचे बंडखोर युवा उमेदवार रवी लांडगे,तर त्यांच्याच पक्षाचे पिंपरीतील अॅड. गौतम चाबूकस्वार या माजी आमदारांनी आपली अपक्ष उमेदवारी मागे घेत असल्याचा शब्द वरील दोन नेत्यांना दिला.त्यामुळे भोसरीत आघाडीचे (राष्ट्रवादी) अजित गव्हाणे,तर पिंपरीत सुलक्षणा शिलवंत-धर या उमेदवारांना मोठा दिलासाच मिळाला नाही,तर त्यामुळे त्यांचे पारडेही जड झाले.राज्यात सत्ता आल्यानंतर न्याय देणार असल्याच्या मिळालेल्या आश्वासनानंतर या दोन्ही बंडखोरांनी आपण अर्ज मागे घेणार असल्याचा शब्द दिला.त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आघाडी विरुद्ध युती अशी थेट लढत होण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यातून आघाडीची मतविभागणी टळल्याने त्याचा त्यांच्याच उमेदवारांना तेथे फायदा होणार आहे.उद्धव ठाकरे सरकार खाली खेचणाऱ्यांना सत्तेतून पायउतार करण्याकरिता हे पाऊल उचलले असल्याचे अहिर म्हणाले.त्याकरिता त्यांनी चाबूकस्वारांचे थेट शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बोलणे करून दिले.आघाडी धर्म पाळीत शहरातील तिन्ही जागा निवडून आणू,असा दावाही त्यांनी केला.यावेळी आघाडीचे तिन्ही उमेदवार (गव्हाणे,धर,चिंचवडचे राहूल कलाटे)हजर होते.
शहरातील आघाडीचे शमल्याने आता लक्ष युतीतील चिंचवडचे बंड असेच थंड होते का याकडे लागले आहे.पण,त्यात त्यांना य़श मिळेल याची शक्यता कमी वाटते आहे. चिंचवडला युतीकडून भाजपचे शंकर जगताप उमेदवार आहेत.त्यांच्याविरुद्ध तेथे युतीतील राष्ट्रवादीचे मातब्बर माजी नगरसेवक तथा पिंपरी महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते नाना काटे आणि याच पक्षाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांनी बंडाचे निशाण नुसते फडकावलेच नाही,तर अपक्ष म्हणून ते रिंगणातही उतरले आहेत.मावळमध्ये अजित पवारांचे कट्टर समर्थक सुनील शेळके हे विद्यमान आमदार पुन्हा उमेदवार आहेत.त्यांच्याविरुद्ध युतीतीलच भाजपने बंड करीत आघाडीचे बंडखोर अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिला आहे.त्यामुळे तो जर त्यांनी मागे घेतला,तर चिंचवडलाही भाजप उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादीच्या काटेंची उमेदवारी मागे घेतली जाऊ शकते,अशी चर्चा आहे. दुसरीकडे भोईर.,मात्र लढण्यावर ठाम आहेत.त्यामुळे चिंचवडमधील युतीचे बंड थंड होण्याची चिन्हे नाहीत.पण, त्यावर शिक्कामोर्तब हे उद्याच अर्ज माघारीची मुदत संपल्यावरच होणार आहे.