चिंचवडला भाजप आणि मतदारांनाही पुन्हा जगतापच का हवेत?

..तर.. चिंचवडला आघाडीला आयात उमेदवार देणे भोवणार…?

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः चिंचवड मतदारसंघात अर्ज छाननीनंतर २८ उमेदवार यावेळी रिंगणात असून त्यात १८ अपक्ष आहेत.बंडखोरांसह त्यातील किती उद्या माघार घेतात त्यानंतर तेथील लढतीचे चित्र नेमके स्पष्ट होणार आहे.पण,या मतदारसंघाचा आतापर्यंतचा इतिहास पाहता तेथील मतदारांना जगतापच का उमेदवार हवेत आणि भाजपच त्यांना उमेदवारी का देते याचे शहराबाहेरील मतदारांना कोडे आहे.

वीस वर्षांनी मतदारसंघाचा पुर्नरचना होते.त्यानुसार २००८ ला ती झाली. त्यात हवेली या राज्यातील सर्वात मोठ्या विधानसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन पिंपरी,चिंचवड आणि भोसरी हे तीन नवे मतदारसंघ निर्माण झाले.तेथे २००९ ला विधानसभेची पहिली निवडणूक झाली. त्यात अपक्ष लक्ष्मण जगताप यांनी बाजी मारली. त्यानंतर २०१४ आणि २०१९ ला ते भाजपकडून निवडून आले.त्यांनी आमदारकीची हॅटट्रिक केली.मात्र, गेल्यावर्षी त्यांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर तेथील पोटनिवणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजपकडून निवडून आल्या.तर,आता २०२४ च्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांचे छोटे बंधू शंकर जगताप हे पुन्हा भाजप म्हणजे युतीचे उमेदवार आहेत. अशाप्रकारे चिंचवड आणि जगताप हे एक समीकरणच झालेले आहे. ते शंकर जगताप पुढे टिकवितात का हे २३ नोव्हेंबरला कळणार आहे.दुसरीकडे सध्या,तरी त्यांचे पारडे जड झालेले असल्याने ते हे समीकरण टिकवतील,पुढे नेतील,अशीच शक्यता दिसते आहे.

भाजपसारख्या घराणेशाहीला विरोध असलेल्या केडरबेस पक्षाने एकाच कुटुंबात सलग पाच टर्म उमेदवारी देण्याचे दुर्मिळ उदाहरण राज्यात चिंचवडला जगतापांच्या बाबतीत घडले आहे.त्याला कारणही तसेच आहे.१९९५ पासून आतापर्यंत राज्यात एकाही पक्षाला स्वबळावर सत्ता आणता आलेली नाही.त्यामुळे युती व आघाडीचीच सरकारे आली,गेली.ज्याचे जास्त आमदार त्या पक्षाचा मुख्यमंत्री होत असल्याने (गेल्यावेळी महायुतीने शिंदेंना ते देऊन अपवाद केला) जो तो आपले अधिक आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न करीत असतो व आहे.त्यातून निवडून येईल त्याला उमेदवारी देण्यात येते. त्याच निकषावर सलग पाचव्यांदा चिंचवडला जगतापांनाच तिकिट देणे भाजपला भाग पडते आहे. कारण या कुटुंबाचा संपूर्ण मतदारसंघावर होल्ड आहे. त्यातही पिंपळे गुरव, सांगवी या भागात त्यांची एकगठ्ठा मते आहेत. हे त्यांना तिकिट मिळण्याचे मुख्य,मोठे कारण आहे.
त्यांच्यामुळे २०१४ पासून हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला झाला असून तो त्यांना पुढे तसाच तो टिकवायचाही आहे.स्व. लक्ष्मण जगतापांमुळेच भाजपला पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या १५ वर्षाच्या सत्तेला २०१७ ला सुरुंग लावता आला.तेथे प्रथमच पक्षाची सत्ता आणता आली. ती सुद्धा त्यांना विधानसभेनंतर होणाऱ्या महापालिका निवडणुकीत राखायची आहे. हे गणितही जगतापांना उमेदवारी देण्यामागे आहे.या कुटुंबाची वादातीत पक्षनिष्ठा, त्यांचे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे हा घटकही त्यांना पुन्हा आमदारकीची संधी देण्यास कारणीभूत ठरतो आहे.

चिंचवड आणि जगताप हे गेल्या १५ वर्षांचे समीकरण शंकर जगताप पुढे नेऊ शकतात यामागील पहिले कारण म्हणजे त्यांना नाही,तर एकूणच जगताप कुटुंबातील उमेदवारी विरोध करणारे पिंपळे सौदागरमधील एक बडं प्रस्थ आणि ज्येष्ठ नगरसेवक बापू तथा शत्रूघ्न यांचा विरोध मावळून ते जगतापांच्या प्रचारात सक्रिय होणे हे म्हणता येईल.त्यांच्यासह जगतापांच्या नुकतेच विरोधात गेलेले वाकड भागातील माजी नगरसेवक संदीप कस्पटे आणि राम वाकडकर या प्रत्येकी किमान दहा हजार मते फिरवू शकणाऱ्यांची त्यांना पुन्हा साथ मिळाल्याने जगतापांचे पारडे जड झाले आहे.त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आघाडीतील राष्ट्रवादीने ऐनवेळी राहूल कलाटे हा आयात केलेला उमेदवार यामुळेही त्यांची बाजू वरचढ झाली आहे.कारण त्यामुळे तेथील राष्ट्रवादीचे मोठे प्रबळ दावेदार नाराज झाले असून त्यातील नाना काटे,भाऊसाहेब भोईर यांनी,तर बंड करीत अपक्ष म्हणून रिंगणात उडीही घेतली आहे. नव्या आयात उमेदवारीची पटकन जुळवून घेणे आघाडीतील तिन्ही पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना अवघड जाणार आहे.या जागेवर आघाडीतील शिवसेनेनेही दावा केला होता.त्यांचे मोरेश्वर भोंडवे तेथे इच्छूक होते.पण,त्यांना तीच नाही,तर शहरातील एकही जागा न मिळाल्याने नाराज शिवसेनेचा फटका आघाड़ीच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *