आघाडी धर्म राखण्यात शिवसेना पास, आता राष्ट्रवादीची पाळी
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःमहाविकास आघाडीमध्ये राज्यभरात बंडखोरी झाली असून त्याला पिंपरी-चिंचवडही अपवाद नाही.तेथील तिन्ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने शिवसेना प्रचंड नाराज झाली.त्यातून त्यांच्या अॅड. गौतम चाबूकस्वार आणि रवी लांडगे य़ांनी पिंपरीत व भोसरीत बंड केले.अपक्ष म्हणून अर्ज भरला.मात्र,त्यांची समजूत काढण्यात शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आणि आमदार सचिन अहिर यांना आज यश आले.या दोन्ही बंडखोरांनी उद्या अर्ज माघारी घेण्याचे ठरवले.त्यामुळे आता खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात काय होते,याकडे लक्ष लागले आहे.
पुणे जिल्ह्यातील २१ पैकी फक्त दोन जागा आघाडीतील शिवसेनेला मिळाल्या असून त्यात खेडची आहे.तेथे त्यांचे बाबाजी काळे उमेदवार आहेत.मात्र,त्यांच्याविरुद्ध आघाडीतील राष्ट्रवादीचे अतुल देशमुख यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज भरला आहे.तो ते मागे घेण्याच्या मनस्थितीत नाहीत.कारण २०१४ पासून ते आमदारकीसाठी इच्छूक आहेत.गेल्यावेळी त्यांनी ती लढलीही.पण,त्यात त्यांना यश आले नाही.म्हणून अभी नही, तो कभी नही या निर्धाराने काल त्यांनी ऱाजगुरुनगर (खेड)येथे मेळावा घेत अपक्ष लढण्याचे ठरवले. मात्र, आघाडीच्या पिंपरी,भोसरीतील आजच्या घडामोडीमुळे त्यांचा निर्धार कायम राहतो की नाही,य़ाकडे लक्ष लागले आहे. कारण आता पिंपरी,भोसरीत एक पाऊल मागे घेत शिवसेनेने तेथील आपल्या दोन्ही अपक्ष बंडखोरांना आज तेथील राष्ट्रवादीच्या उमेदवारांसाठी माघार घ्यायला लावली. आघाडी धर्म पाळला.त्यामुळे आता राष्ट्रवादीवर तो पाळण्यासाठी आपसूक दबाव आला आहे. परिणामी तो ते खेडला पाळणार हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

