पूर्वतयारी,उपाययोजना आणि जनजागृतीमुळे यावर्षी उद्योगनगरीत फटाक्यांमुळे लागल्या कमी आगी
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःदिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अग्निशमन दलाची देशभरात मोठी पळापळ होते.कारण या दिवशी पाच दिवसाच्या
दिपावली उत्सवातील सर्वात जास्त फटाके वाजवले जातात.मग त्यातून आगी लागतात.त्यात वित्त आणि प्राणहानी होऊ नये म्हणून फायर ब्रिगेड दक्ष असतं.तरीही पिंपरी-चिंचवडमध्ये काल लक्ष्मीपूजनाच्या रात्री अवघ्या पाच तासात वीस आगी लागल्या.मात्र, अग्निशमन जवानांच्या तत्परतेने मोठी हानी झाली नाही.
फटाक्यांमुळे लागलेल्या आगीचा श्रीगणेशा दापोडी येथील श्रीसंगम सोसायटीपासून गुरुवारी मध्यरात्रीनंतर झाला. तेथील एका फ्लॅटला आग लागली.त्यानंतर दिवसभरात दहा आगीचे कॉल फायर ब्रिगेडला आले.त्यातील आठ जागी फटाक्यांमुळे आग लागलेल्या होत्या. त्यानंतर काल लक्ष्मीपूजनाला आगीचा आकडा दुप्पट झाला.२० ठिकाणी त्या लागल्या.त्यातील बहूतांश या फटाक्यामुळे लागल्या होत्या. पिंपळे गुरव येथे काही तासांत तीन आगी फटाक्यांमुळे लागल्या. नारळाच्या झावळ्यात पेटते फटाके वा अग्निबाण घुसून त्या जळून गेल्याच्याही दोन घटना घडल्या.काल पहिली आग बोपखेल येथील कचऱ्यावर पेटता फटाका पडल्याने,तर दुसरी प्राधिकरण सेक्टर २४ मधील नारळाच्या झाडाला त्य़ामुळेच लागली.नंतर पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय,ऑरेंज पार्क सोसायटीचा दुसरा आणि तिसरा मजला,कल्पतरु सोसायटी,डांगे चौकातील सिग्नेचर पार्कचा दहावा मजला,यमुनानगरचा एलआयसी चौक,मासूळकर कॉलनीत फ्लॅट,अजमेरा कॉलनीत झाड, मोरया गोसावी राज पार्क,चिंचवड येथील दुसऱ्या मजल्याची गॅलरी,स्पाईन रोड, भोसरी येथील बिल्डींगचं टेरेस,कोकणे चौकातील गोदाम,पिंपरी मार्केट,जुनी सांगवी आदी वीस ठिकाणी रात्री आठ ते मध्यरात्री एक वाजेपर्यंत पाच तासात आगीचे वीस कॉल आल्याने फायर ब्रिगेडची मोठी पळापळ झाली.
दरम्यान,शहराची भंगार मालाची बाजारपेठ असलेल्या व एरव्हीही वर्षभर मोठ्या आगी लागणाऱ्या कुदळवाडी,चिखलीत दिवाळीत आग न लागल्याने अग्निशमन दलच नाही,तर पालिका प्रशासनानेही सुटेकाच सुस्कारा यावेळी सोडला.त्यामागे नाही,तर गतवर्षापेक्षा आगीच्या घटना कमी होण्यामागे प्रशासनाने केलेले आगाऊ उपाय आणि जनजागृती हे मुख्य कारण ठरले.दहा अग्निशमन केंद्रांसह इतर आठ अशा शहरात १८ ठिकाणी अग्निशमन दलाचे बंब तैनात करण्यात आले होते. त्यामुळे कमी वेळात घटनास्थळी धाव घेता आल्याने आर्थिक नुकसान कमी झाले,असे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सहाय्यक आयुक्त (अग्निशमन दल) मनोज लोणकर यांनी आपला आवाजला सांगितले.दिवाळीत आग लागण्याचा संभव असलेल्या कुदळवाडी,चिखलीतील ३७ प्रॉपर्टी प्रशासनाने सील केल्यानेही तेथे यावेळी आग लागली नाही,असे ते म्हणाले.