उत्तम कुटे
छाननीनंतर जुन्नर विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार राहिले असून अर्ज माघारीची मुदत संपेपर्यत (ता.४) त्यातील आणखी काही माघार घेण्याची दाट शक्यता आहे.त्यातही आघाडी युतीतील मातब्बर बंडखोर माघार घेतात का याकडे खास लक्ष असणार आहे.ते शर्यतीत राहतात की नाही,यावरच कोण विजयी होणार गणित अवलंबून आहे.दरम्यान, या ठिकाणी आघाडीला वातावरण चांगले असले,तरी त्यांनी उमेदवार आयत्या वेळी आय़ात केल्याने त्याचा फटका त्यांना बसतो की काय हे २३ नोव्हेंबरलाच कळणार आहे.
जुन्नरला आघाडीकडे एकसे एक दमदार इच्छूक असतानाही त्यांनी उमेदवार आयात केल्याने त्यांचा उमेदवार चुकल्याची मतदारसंघात चर्चा आहे.स्थानिक खासदार आघाडीतील राष्ट्रवादीचे डॉ.अमोल कोल्हे यांनी ओतूर येथील जाहीर सभेत जुन्नरचा उमेदवार हा आय़ात नसेल,असे सांगितले होते.मात्र,पक्षात प्रवेश न करताही कॉंग्रेसच्या सत्यशील शेरकरांना राष्ट्रवादीने तेथे उमेदवारी दिली.त्यामुळे कोल्हे यावर काय उत्तर देतात,हे पाहण्यासारखे आहे.उमेदवार आयात केल्याने राष्ट्रवादीच नाही,तर ठाकरे शिवसेनेचे इच्छूकही नाराज झाले असून त्याचा फटका आघाडीला बसू शकतो. या नाराजीतूनच ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली खंडागळे यांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली.ते रिंगणात राहिले,तर त्याचा आणि राष्ट्रवादीच्या नाराज इच्छूकांचा असा दुहेरी फटका शेरकरांना बसण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांनीही राष्ट्रवादीत बंडखोरी करीत वंचित बहूजन विकास आघा़डीकडून उमेदवारी अर्ज भरला आहे.आदीवासींसह वंचितच्या मतांमुळे ते ही माघार घेण्याची शक्यता नाही. .अशा तिरंगी वा बहूरंगी लढतीचा फायदा तेथेच नाही,तर राज्यभरात युतीला होतो,हा इतिहास आहे.त्यामुळे बेनकेंना तेथे मतविभागणीचा फायदा मिळू शकतो.
जुन्नरला,तर युतीत एक नाही,दोघांनी बंडखोरी केली आहे.पूर्वी विधानसभा लढलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्या,भाजपच्या आक्रमक नेत्या आशा बुचके तसेच माजी आमदार शिंदे शिवसेनेचे शरददादा सोनवणे यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे.सोनवणेंचा गतवेळी बेनकेंकडून निसटता पराभव पराभव झाला होता.त्यांच्यासह बुचकेही माघार घेण्याची शक्यता यावेळी दिसत नाही.त्यामुळे तेथे बहूरंगी लढत होण्याची शक्यता आहे.जर, युतीतील हे बंड शमले नाही,तर,मात्र बेनकेंची थोडी अडचण होऊ शकते.पण, युती तथा भाजपचे राज्यातील सर्वोच्च नेते,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत शनिवारी पुणे,पिंपरी-चिंचवड,मावळ,उत्तर पुणे जिल्ह्यासह संपूर्ण जिल्ह्यातील युतीतील बंड शमविण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहे.त्यांच्या प्रयत्नाला यश येऊन जुन्नरमधील युतीतील बंड थंड झाले,तर, बेनकेंचे पारडे जड होणार आहे.