आंबेगावात वळसे विरुद्ध निकम नाही,तर वळसे विरुद्ध शरद पवार असा सामना

वळसे सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याच्या विक्रमाच्या जवळ

उत्तम कुटे
पिंपरीःअर्ज छाननीनंतर आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवार राहिले आहेत. त्यातील किती ४ तारखेपर्यंत माघार घेतात त्यानंतर तेथील लढतीचे चित्र पूर्ण स्पष्ट होणार असले,तरी तेथे गेल्यावेळेसारखीच थेट म्हणजे दुरंगी लढत आणि ती ही दोन राष्ट्रवादीतच होणार आहे.तेथे युतीकडून (राष्ट्रवादी) राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील,तर आघाडीचे (राष्ट्रवादी) देवदत्त निकम हे उमेदवार आहेत.पण, प्रत्यक्षात लढत ही वळसे विरुद्ध शरद पवार अशीच होणार आहे.

निकम हे राष्ट्रवादीचे पुणे जिल्हा कार्याध्यक्ष आहेत.वळसेंनीच त्यांना भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यापासूनची सगळी पदे दिली आहेत. तसे ते निकमांना गुरुस्थानीच आहेत. तर, वळसेंचे गुरु शरद पवार आहेत. वळसे हे पूर्वी पवारांचे पीए होते. त्यांनीच वळसेंना सहकारमंत्र्यांपर्यंत एक नाही,तर अनेक संधी दिल्या. त्यांना १९९०ला पहिलं आमदार केलं.नंतर २०१९ पर्यंत तिकिट दिल्याने सलग सात टर्म निवडून येण्याचा विक्रम वळसेंना करण्यात आला.गेल्यावेळी,तर ६६,३५९ एवढ्या दणदणीत मतांनी ते विजयी झाले. त्यांनी त्यावेळी शिवसेनेचे राजाराम बाणखेले यांचा पराभव केला.पण,दरम्यान पुलाखालून खूप पाणी वाहून गेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फुटल्याने आंबेगावच नाही,तर पूर्ण राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली. त्याची परिणती आंबेगावात यावेळी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना नाही,तर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पहायची वेळ आली आहे.

वळसेंसमोर प्रतिस्पर्धी म्हणून निकमांचे आव्हान तोकडे वाटते आहे. कारण वळसे सलग सात टर्म आमदार असून विद्यमान कॅबिनेट मंत्री आहेत. तर, निकम एकदाही आमदार झालेले नाही.त्यात वळसेंनी आपल्या कामाच्या जोरावर आंबेगावातील मतदार जोडलाच नाही, तर बांधूनही ठेवला आहे. सात वेळची आमदारकी त्याला दुजोरा देत आहे. त्यांनी एकेकाळच्या पडीक जमिनी धरणे बांधून सुपीक केल्यात ही बाबही त्यांच्या दृष्टीने जमेची आहे.आंबेगावच्या केलेल्या विकासाची जाण ठेवून मतदार त्यांना मतदान करतील,असा अंदाज आहे.शांत,संयमी स्वभाव,कुणाशीही नसलेले वैर आणि कार्यकर्त्यांचे जाळे या बाबीही त्यांच्या पथ्यावर पडणाऱ्या आहेत.त्याउलट निकमांकडे कार्यकर्त्यांचे तुलनेने तेवढे नेटवर्क नाही.ही बाब त्यांच्या विरोधात जाऊ शकते.त्यांच्यादृष्टीने ही लढाई सोपी नाही.कारण गेल्यावेळी तब्बल सव्वा लाख मते घेत ६३ हजाराच्या लीडने वळसे विजयी झालेले आहेत.त्यामुळे उमेदवारीची लॉटरी निकमांना लागली असली,तरी ती विजयाची लागणे अवघड दिसत आहे.फक्त शरद पवारांची यावेळी त्यांना लाभलेली साथ किती त्यांना हात देते,हे २३ तारखेला समजणार आहे.एकूणच
पवार, वळसे आणि वळसे, निकम गुरु शिष्याच्या या लढतीकडे उत्तर पुणे जिल्हाच नाही,पूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *