शरद पवारांना मानणारा मतदार विरुद्ध बेनके कुटुंबाची पकड असलेला मतदार असा सामना होणार
उत्तम कुटे
पिंपरीःपुणे जिल्ह्याच्या उत्तर टोकाकडील जुन्नर विधानसभा मतदारसंघातील एकही अर्ज बाद न होता १७ च्या १७ काल वैध ठरले. त्यातील १३ अपक्षांपैकी दोघांनी,जरी माघार घेतली,तरी तेथे मतदानासाठी २० नोव्हेंबरला एकच मतदानयंत्र लागेल. दरम्यान, अर्ज छाननींतर तेथील लढत ही चौरंगी असून अर्ज माघारीनंतर (४ नोव्हेंबर) ती थेट होण्याचीही शक्यता आहे.
आघाडीचे (राष्ट्रवादी) सत्यशील शेरकर आणि युतीकडून (राष्ट्रवादी) विद्ममान आमदार अतुल बेनके जुन्नरला मुख्य उमेदवार असून तेच एकमेकांचे प्रमुख प्रतिस्पर्धीही आहेत.तेथे युतीत बंडखोरी झाली असून भाजपच्या आक्रमक नेत्या माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके आणि माजी आमदार शिवसेनेचे शरददादा सोनवणे हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याने तेथील लढत छाननीनंतर,तरी चौरंगी झालेली आहे.अर्ज माघारीनंतरही ती तशीच राहिली,तर युतीची मते विभागली जाऊन त्याचा फायदा आघाडीच्या उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.दरम्यान, भाजप बंडखोरांनी माघार घेतली नाही,तर कडक कारवाई करू,असा इशारा या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्याने जुन्नरच नाही,तर राज्यभरातील त्यांचे बंडखोर आपल्या तलवारी म्यान करण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिंदे शिवसेनेच्या बाबतीत झाले,तर जुन्नरला आघाडी विरुद्ध युती अशी थेट होईल.ती तशी की बहूरंगी कशी होणार हे,मात्र ४ तारखेलाच कळेल.
बेनके आणि शेरकर या दोन्ही उमेदवारांचे प्लस,मायनस पॉंईट आहेत. चिंचवड मतदारसंघावर जसा जगताप कुटुंबाचा होल्ड आहे,तसाच काहीसा तो जुन्नरवर बेनके कुटुंबांचा आहे. चिंचवडला लक्ष्मण जगताप पहिल्यांदा तीनदा, चौथ्यांदा त्यांच्या पत्नी अश्विनी असे पती-पत्नीच या मतदारसंघाच्या निर्मितीपासून चार वेळा आमदार राहिले आहेत.तसेच चारवेळा अतुल बेनकेंचे वडील आणि शरद पवारांचे कट्टर समर्थक वल्लभ बेनके हे २००९ पर्यंत जुन्नरचे आमदार होते.२०१९ ला अतुल बेनके आमदार झाले.त्यातून बेनके कुटुंबाचा या मतदारसंघावर होल्ड असल्याचे दिसले.त्याचा फायदा यावेळी अतुल बेनकेंना मिळण्याची शक्यता आहे.त्याचवेळी राष्ट्रवादी फुटल्यानंतर कित्येक दिवस कुंपणावर ते राहून अखेरीस अजित पवारांबरोबर गेले.त्यामुळे गद्दारीचा फटकाही त्यांनी बसू शकतो.तर, जुन्नर तालुक्यातील मतदार शरद पवारांना मानणारा असून तेथील आदिवासी मतदारांवर त्यांचा प्रभाव आहे.त्याचा लाभ शेरकरांना मिळू शकतो.ते जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असल्याने कारखान्याच्या सभासद कुटुंबाची काही हजार मते त्यांना मिळू शकतात.त्यांचे चुलते निवृत्ती शेरकर हे खासदार होते.त्याचाही फायदा त्यांना होऊ शकतो.त्याचवेळी आय़ात उमेदवार हा त्यांच्याविरुद्ध जाणारा मोठा कळीचा मुद्दा ठरू शकतो.एकूणच जमेची बाजू या दोघांतील कोणाला उपयोगी पडते आणि तोट्याच्या बाबीचा कोणाला फटका बसतो,हे २३ नोव्हेंबरला निकालाच्या दिवशीच समजणार आहे.

