डॉ. अमोल कोल्हे यांची राजकीय डिप्लोमसी,राहुल कलाटेंसाठी चिंचवडच्या मैदानात..

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःआघाडीतील शिरुरचे शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी युतीतील शिंदे शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या मतदारसंघातील पिंपरी आणि चिंचवड या दोन मतदारसंघात सलग दोन दिवस हजेरी लावली. त्यात त्यांनी चिंचवडसाठी आज दिलेला चार तासांचा दिलेला मोठा वेळ पाहता त्यांचे मित्र आणि आघाडीचे (राष्ट्रवादी) तेथील उमेदवार राहुल कलाटे यांच्यासाठी राजकीय डिप्लोमसीची संधी खा.कोल्हेंनी साधली अशी चर्चा राजकीय वर्तुळात लगेच रंगली.

काल खा.कोल्हे हे कलाटेंचा अर्ज भरण्याच्या वेळेस आवर्जून उपस्थित होते.तशीच हजेरी त्यांनी पिंपरीतील त्यांच्या पक्षाच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर यांनी अर्ज दाखल केला,तेव्हाही लावली.आज चिंचवड मतदारसंघातील वाकड येथील एका हॉटेलातील दिवाळी फराळ कार्यक्रमाला ते उपस्थित राहिले.पहिल्यांदा त्यांनी एवढा वेळ शहरासाठी आणि तो ही त्यांच्या मतदारसंघाबाहेरील विधानसभेच्या जागांसाठी दिला,हे विशेष.त्यांचे खूप जवळचे स्नेही कलाटेंसाठी त्यांनी तो दिल्याची चर्चा नंतर झाली. यावेळी कलाटेंसह त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी उमेदवार भाजपचे शंकर जगताप यांच्यासह खा.बारणे, माजी खासदार अमर साबळे, पिंपरीचे आमदार आणि युतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे, पिंपरीचे माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, माजी महापौर संजोग वाघेरे, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे, चिंचवडमध्ये युतीत बंडखोरी करून अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेले राष्ट्रलवादीचे ज्येष्ठ नेते,राज्य नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर, पिंपरी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, भाजपचे सचिन साठे, माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, मयूर कलाटे, तुषार हिंगे आदी यावेळी उपस्थित होते.

मी, माझा अशी ही निवडणूक नसून ती महाराष्ट्र धर्म वाचविण्याची आहे,असे कोल्हे यावेळी म्हणाले.चिंचवडची जागा अजित पवार आपल्या कार्यकर्त्यांसाठी सोडवून घेऊ शकले नाहीत हे वास्तव आहे,असा टोला त्यांनी मारला. एकदा शून्यावर आउट झाला म्हणजे सचिन पुन्हा सेंचुरी करत नाही असे नाही. त्यामुळे आपण निकालाची वाट बघुयात. असे सूचक वक्तव्य त्यांनी कलाटेंच्या चिंचवडमधील मागील पराजयावर केले.दरम्यान, विधानसभा निवडणुकांचा सुरू असलेला रणसंग्राम, त्यात होणारे बेछूट आरोप – प्रत्यारोप, त्यामुळे तापलेले वातावरण, वर्षानुवर्षांचे हेवेदावे, कुरघोडीचे राजकारण… हे सगळं काही बाजूला ठेवून विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार, खासदार, विधानसभेचे उमेदवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा यावेळी चार तास गप्पांचा फड रंगला.राजकारणातील एकमेकांचे विरोधक तसेच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी गळाभेट घेऊन एकमेकांना शुभेच्छाही दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *