जुन्नर तालुक्यात तीन – तीन शरद सोनवणे निवडणुकीच्या रिंगणात;रडीचा डाव की राजकीय डावपेच..?

नारायणगाव :- (किरण वाजगे, कार्यकारी संपादक)
एवरीथिंग इज फेअर लव इन वॉर म्हणजेच युद्धात आणि राजकारणात सर्व काही माफ असतं, या म्हणीप्रमाणे जुन्नर तालुक्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या आहेत.
शरद सोनवणे या नावाचे तीन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले असून यामध्ये माजी आमदार शरद भीमाजी सोनवणे यांच्यासह शरद शिवाजी सोनवणे व शरद बाबासाहेब सोनवणे या दोन अपक्षांचे उमेदवारी अर्ज आज छाननी मध्ये वैध ठरले आहेत.
दरम्यान माजी आमदार शरद सोनवणे व्यतिरिक्त इतर जे दोन अपक्ष उमेदवार म्हणून उभे आहेत त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये मुलांची नाव सारखीच असून त्यामध्ये काही रकाने लिहायचे राहिले असल्यामुळे ते दोन्हीही अर्ज बाद करावेत अशी मागणी काही वकील मंडळींनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे केली होती परंतु दहा मिनिट उशीर झाल्यामुळे त्यांची हरकत फेटाळली असून ही वकील मंडळी न्यायालयात गेली तर नक्की निकाल काय लागेल हे गुलदस्त्यात आहे.


विधानसभा निवडणूक अर्ज छाननी च्या आजच्या दिवशी महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे अतुल बेनके, महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यशील शेरकर, बहुजन समाज पार्टीचे जुबेर अस्लम शेख तसेच देवराम सखाराम लांडे हे वंचित बहुजन आघाडी च्या वतीने निवडणूक लढवत असून या चार राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांचे अधिकृत उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी घाटगे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुनील शेवाळे यांनी दिली.
दरम्यान शरद सोनवणे या नावाचे तीन उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून भरण्यात आले आहेत यामध्ये माजी आमदार शरद भिमाजी सोनवणे तसेच मांजरगाव तालुका निफाड, जिल्हा नाशिकचे शरद शिवाजी सोनवणे व हिंगणगाव तालुका नगर जिल्हा अ.नगर येथील शरद बाबासाहेब सोनवणे यांचे उमेदवारी अर्ज वैद्य ठरविण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे मारुतीच्या भाजपच्या बंडखोर उमेदवार आशाताई दत्तात्रय बुचके, अपक्ष काळू गागरे, निलेश भुजबळ, योगेश तोडकर, रमेश हांडे, रमेश पाडेकर, राजेंद्र ढोमसे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची जुन्नर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, आकाश आढाव, राजेंद्र ढोमसे, सुखदेव खरात या सर्वांचेच उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले असून एकूण १७ उमेदवार निवडणूक रिंगणात असून २९ उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
दरम्यान येत्या चार नोव्हेंबर रोजी अर्ज माघारी नंतर निवडणूक चिन्ह वाटप होणार असून त्यानंतरच खरी लढत कोणकोणत्या उमेदवारात होईल हे चित्र स्पष्ट होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *