शक्तीप्रदर्शन करत आघाडीच्या कलाटेंनी भरला अर्ज,रॅलीत युवकांचा लक्षणीय सहभाग

मावळ लोकसभेतील पिंपरी,चिंचवडमधील आपल्या उमेदवारांसाठी शिरुरचे खासदार कोल्हे राहिले खास उपस्थित उत्तम कुटे,संपादकपिंपरीःभोसरीतील आघाडीचे (राष्ट्रवादी) उमेदवार अजित गव्हाणेंचा अर्ज भरताना त्यांच्या पक्षाचे स्थानिक खासदार शिरुरचे डॉ.अमोल कोल्हे आवर्जून उपस्थित होते. तशीच हजेरी त्यांनी आपल्या मतदारसंघाबाहेरील चिंचवड आणि पिंपरी या दोन ठिकाणी आपल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला तेव्हा कालही (ता.२९) लावली.उद्योगनगरीतील या तिन्ही ठिकाणी त्यांची मुलूखमैदान…

मावळ लोकसभेतील पिंपरी,चिंचवडमधील आपल्या उमेदवारांसाठी शिरुरचे खासदार कोल्हे राहिले खास उपस्थित

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःभोसरीतील आघाडीचे (राष्ट्रवादी) उमेदवार अजित गव्हाणेंचा अर्ज भरताना त्यांच्या पक्षाचे स्थानिक खासदार शिरुरचे डॉ.अमोल कोल्हे आवर्जून उपस्थित होते. तशीच हजेरी त्यांनी आपल्या मतदारसंघाबाहेरील चिंचवड आणि पिंपरी या दोन ठिकाणी आपल्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला तेव्हा कालही (ता.२९) लावली.उद्योगनगरीतील या तिन्ही ठिकाणी त्यांची मुलूखमैदान तोफ प्रचारात धडाड़णार आहे.

पिंपरीतील राष्ट्रवादीचे उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर यांच्यानंतर खा.कोल्हे यांनी त्यांचे स्नेहपूर्ण सबंध असलेले चिंचवडचे उमेदवार राहूल कलाटे यांच्या अर्ज भरण्याच्या वेळीही खास हजेरी लावली.त्यांच्यामुळेच कलाटेंना तिकिट मिळाल्याची चर्चा आहे.कलाटेंनी जोरदार शक्तीप्रदर्शन करीत काल अर्ज दाखल केला.त्यानिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत युवकांचा लक्षणीय सहभाग दिसून आला.काँग्रेसचे राष्ट्रीय सनचिव पृथ्वीराज साठे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे, प्रदेश विद्यार्थी अध्यक्ष सुनिल गव्हाणे, युवक शहराध्यक्ष इम्रान शेख,माजी नगरसेवक नवनाथ जगताप, मच्छिन्द्र तापकीर, संपत पवार आदी रॅलीत सहभागी झाले होते. वाकडचे ग्रामदैवत श्री म्हातोबाचे दर्शन घेऊन रॅली सुरु झाली.तत्पूर्वी सुवासिनींनी कलाटेंचे औक्षण केले. त्यानंतर टाक्यांची आतषबाजी आणि पुष्पवृष्टी झाली.त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात रॅली निघाली.वाकड चौक, दत्त मंदिर रोड, पिंक सिटी, छत्रपती चौक, काळेवाडी फाटा, रहाटणी फाटा, तापकीर चौक, केशवनगर, चिंचवडगाव, थेरगाव फाटा, थेरगाव गावठाण या मार्गे ती अर्ज भरण्याच्य ठिकाणी थेरगावात गेली.त्यापूर्वी तिच्यावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी केली गेली. जेसीबीतून पुष्पहार घालण्यात आले.

चिंचवडला पुढच्या ५० वर्षांचा विचार करून विकास करणारा आमदार हवा आहे,तेथील प्रलंबित प्रश्न सोडवून विकासाच्या दिशेने चिंचवडला न्यायचे आहे,असे अर्ज भरल्यानंतर कलाटे यांनी सांगितले.महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि महाराष्ट्र धर्म वाचविण्याच्या या लढाईत शरदचंद्र पवार व उद्धव ठाकरेंचे हात बळकट करण्यासाठी मी लढतो आहे,असे ते म्हणाले.
चिंचवड मतदार सुज्ञ असून त्यांनी आजच आघाडीला विजयाचा कौल दिला आहे,असा दावाही त्यांनी रॅलीतील गर्दी पाहून केला.