राज्यात उमदेवारांचे आले महापीक,२८८ जागांसाठी आठ उमेदवारांचे अर्ज
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःराज्यात २८८जागांसाठी ७ हजार ९९५ म्हणजे जवळजवळ आठ हजार जणांनी अर्ज भरले आहेत. एका जागेसाठी सरासरी २८ उमेदवार रिंगणात आहेत.पिंपरी-चिंचवडमध्ये,तर अनेकांना आमदार व्हायचं असल्याने तेथे तीन जागांकरिता ९५ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.तेथेही एका आमदाराच्या जागेसाठी ३२ जण गुडघ्याला बाशिंग तयार आहेत.दरम्यान, पिंपरी-चिंचव़ड, पुणे शहर,पुणे जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातच यावेळी मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने ते शमवायचे कसे या चिंतेत मुख्य उमेदवार पडलेले आहेत.
पुणे जिल्ह्यातील २८ जागांसाठी ५४६ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे.म्हणजे एका जागेसाठी २६ जण रिंगणात आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे ३९ उमेदवार हे पिंपरी या तुलनेने छोट्या मतदारसंघातून आले आहेत,हे विशेष.तर, सर्वात मोठ्या चिंचवडमध्ये ही संख्या ३२ आहे.तर,तिसऱ्या भोसरीत हा आकडा सर्वात कमी म्हणजे २४ आहे.जिल्ह्यात जु्न्नरला सर्वात कमी म्हणजे १७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.त्यातील काही अपक्ष ४ तारखेपर्यंत माघार घेण्याची शक्यता असल्याने तेथे मतदानासाठी एक मतदानयंत्र लागणार आहे.आंबेगाव वीस,खेड-आळंदी २३,शिरुर २८,तर मावळात १८ उमेदवार रिंगणात आहेत.त्यातील किती माघार घेतात त्यानंतर तेथील लढतीचे चित्र येत्या ४ तारखेला स्पष्ट होणार आहे.
बंडखोरीचे पीक
राज्यात बंडखोरीचे मोठे पीक यावेळी आल्याने उमेदवारांची संख्या वाढली आहे. पुणे जिल्हाही त्याला अपवाद नाही.तेथील २१ पैकी १९ मतदारसंघात बंड झाल्याने तेथील मुख्य उमेदवारांचे टेन्शन वाढले आहे.पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही जागी बंडखोरांनी अर्ज भरले आहेत.त्यात चिंचवडला युतीतील राष्ट्रवादीचे मातब्बर भाऊसाहेब भोईर हे माघार घेण्याची अजिबात शक्यता नसल्याने तेथे किमान तिरंगी लढत होणार आहे.तेथे युतीतील नाना काटे,उमेदवारीसाठी अजित पवार राष्ट्रवादीतून नुकतेच ठाकरे शिवसेनेत गेलेले मोरेश्वर भोंडवे,भाजपचे चंद्रकांत नखाते असे तिन्ही ज्येष्ठ माजी नगरसेवक अपक्ष म्हणून रिंगणात आहेत.भोसरीत उमेदवारांची संख्या कमी तशीच ती बंडखोरांचीही आहे. तेथे आघाडीत बंड झाले असून शिवसेनेचे रवी लांडगे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.परंतू,ते मागे घेण्याचे संकेत त्यांनी स्वतच दिले आहे.तर,जिल्ह्यात सर्वात जास्त उमेदवार असलेल्या पिंपरीत सर्वाधिक बंडखोर आहेत.तेथे युतीतील आऱपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेने जितेंद्र ननावरे,अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी बंडाचे निशाण फडकावलेले आहे.मात्र,ते शमण्याची चिन्हे आहेत.तेथे आघाडीच्या (राष्ट्रवादी)उमेदवार सुलक्षणा शिलवंत-धर असून त्यांच्याविरुद्ध कॉंग्रेसचे मनोज कांबळे यांनी बंडखोरी करीत अर्ज भरला आहे.पण,तो ते माघार घेण्याचीच शक्यता अधिक आहे
जिल्ह्यात मावळ,जुन्नर,शिरुर,खेड,आंबेगाव आदी ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे टेन्शन अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या त्यांच्या बंडखोरांनी वाढवले आहे.मावळमध्ये युतीतील राष्ट्रवादीचे उमेदवार,विद्यमान आमदार सुनील शेळकेंविरुद्ध त्यांच्याच पक्षाचे मातब्बर बापूसाहेब भेगडेंनी दंड थोपटले आहेत.नमूद करण्याजोगी बाब म्हणजे तेथे शेळके यांच्याविरोधात आघा़डीने उमेदवार न देता भेगडेंनाच पुरस्कृत केले आहे. तर,युतीतील भाजपनेही शेळकेंना विरोध करीत भेगडेंना पाठिंबा दिला आहे.जुन्नरला महायुती आणि महाआघाडी अशा दोन्हींत बंड झाले आहे.तेथे राष्ट्रवादीचे अतुल बेनके हे महायुतीचे उमेदवार आहेत.पण,त्यांच्याविरुद्ध युतीतील भाजपच्या आक्रमक नेत्या आशा बुचके यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे.तर,तेथील आघाडीचे उमेदवार सत्यशील शेरकर यांच्याविरुद्ध आघाडीतील शिवसेनेचे माऊली खंडागळे रिंगणात उतरले आहेत.शिरुरला युतीचे ज्ञानेश्वर तथा माऊली कटके (राष्ट्रवादी) यांच्याविरुद्ध भाजपचे प्रदीप कंद यांनी बंड करीत अर्ज भरला आहे.आंबेगावात आघा़डीतील राष्ट्रवादीचे देवदत्त निकम अधिकृत उमेदवार आहेत.त्यांच्याविरुद्ध त्यांच्याच पक्षाचे तालुका अध्यक्ष अधर अब्बाल हुसेन इनामदार आणि ठाकरे शिवसेनेच्या सुरेखा निघोट रिंगणात उतरलेल्या आहेत.

