उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे पिंपरी आणि चिंचवडला किमान दोन ईव्हीएम लागणार
उत्तम कुटे
पिंपरीःअर्ज दाखल करण्याच्या आजच्या (ता.२९) शेवटच्या दिवशी बहूतांश उमेदवारांनी अर्ज दाखल केले.उद्या त्यांची छाननी आहे. दरम्यान,चिंचवड आणि पिंपरी या दोन जागांसाठी तब्बल ७१ जणांनी उमेदवारी दाखल केली. त्यातील कितीजण ४ तारखेपर्यंत माघार घेतात,त्यानंतरच तेथील लढतीचे चित्र स्पष्ट होईल.तसेच मतदानासाठी किती ईव्हीएम लागतील,हे ही कळेल.
दरम्यान,पिंपरी व चिंचवडला थेट नाही,तर बहूरंगीच लढती होतील,असे संकेत उमेदवारांची गर्दी आणि यावेळी झालेल्या मोठ्या बंडखोरीतून मिळाले आहेत.पिंपरी या शहरातील तीनपैकी सर्वात लहान आणि एससीसाठी राखीव मतदारसंघात उमेदवारांची मांदियाळी दिसून आली. तेथे ३९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले.तर, शहरातील सर्वात मोठा आणि राज्यात दोन नंबरवर असलेल्या चिंचवडमध्ये पिंपरीच्या तुलनेत कमी म्हणजे ३२ जणांनी ते भरले आहेत.भोसरीचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाकडे वारंवार विचारणा करूनही त्यांनी हा तपशील दिला नाही.पुणे जिल्हा माहिती अधिकारी आणि त्या कार्यालयही ही माहिती वेळेत देऊ शकले नाहीत.

पिंपरीतून ९९ जणांनी १८९ उमेदवारी अर्ज नेले होते.परंतू,त्यातील ३९ उमेदवारांनी ते ४५ दाखल केले.म्हणजे काहीजणांनी ते एकापेक्षा जास्त भरले आहेत. राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री, पुणे जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि कोथरुडधील भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करणारे मनोज गरबडे यांनी वंचित बहूजन आघाडीकडून पिंपरीत अर्ज भरला. युतीत येथे बंडखोरी झाली असून आऱपीआयच्या चंद्रकांता सोनकांबळे, शिवसेनेचे जितेंद्र ननावरे, राष्ट्रवादीचे काळुराम पवार यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली.तर आघाडीतही बंड झाले असून ठाकरे शिवसेनेचे अॅड गौतम चाबूकस्वार, कॉंग्रेसचे मनोज कांबळे हे ही अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.तेथे युतीचे (राष्ट्रवादी)अण्णा बनसोडे आणि आघाडीच्या (राष्ट्रवादी) सुलक्षणा शिलवंत-धर या मुख्य उमेदवार आहेत.
चिंचवडला ३२ उमेदवारांनी ४४ अर्ज भरले आहेत.तेथेही युतीत बंडखोरी झाली असून राष्ट्रवादीचे भाऊसाहेब भोईर आणि नाना काटे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.भोईरांनी पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीतूनही अर्ज भरला आहे. तिसऱ्या आघाडीतील छत्रपती संभाजीराजे यांच्या महाराष्ट्र स्वराज पक्षाकडून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, संभाजी ब्रिगेडकडून तसेच अपक्ष म्हणूनही अरुण पवार यांनी अर्ज दाखल केला.येथे युतीचे (भाजप) शंकर जगताप आणि आघाडीचे (राष्ट्रवादी) राहूल कलाटे उमेदवार आहेत.
