गद्दारांना माफी नाही, पक्ष सोडून गेलेल्यांना खा.डॉ.कोल्हेंचा कडक इशारा..

कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त जल्लोषात सुलक्षणा शीलवंत-धर यांनी पिंपरीत भरला उमेदवारी अर्ज

उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःचुकीला एक वेळ माफी असू शकते, परंतू गद्दारीला नाही. ज्यांनी पक्षाबरोबर ती केली त्यांना माफ केले जाणार नाही, असा कडक इशारा शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी मंगळवारी (ता.२९) पिंपरीत दिला.पिंपरीतील त्यांच्या पक्षाच्या तथा आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत-धर यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी नाव न घेता पिंपरीचे आमदार आणि युतीचे (अजित पवार राष्ट्रवादी) उमेदवार अण्णा बनसोडेंसह पक्ष फुटीनंतर तो सोडून गेलेल्यांवर हल्लाबोल केला.

बनसोडे यांनी कालच अर्ज भरला.तर, आज सुलक्षणा यांनी तो भरल्यांनतर त्या वाघीण आहेत,पक्ष अडचणीत होता त्यावेळी भले भले मागे हटत होते, परंतू ही वाघीण मैदानात उतरली आहे, या शब्दात कोल्हेंनी सुलक्षणा यांचे त्यांचे कौतूक केले.सूर्य अस्ताला जात असताना प्रकाशाचे काय असा प्रश्न सूर्याला पडला होता त्यावेळी एक पणती पुढे आली.तिने अंधार दूर करता येतो हा विश्वास जगाला दिला. त्याचप्रमाणे सुलक्षणा या विश्वास देणाऱ्या उमेदवार असल्याने आपले सर्वस्व पणाला लावून त्यांना विजयी करावयाचे आहे,असे आवाहन कोल्हेंनी यावेळी केले.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे म्हणाले की, शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणाऱ्या उच्चशिक्षित उमेदवार आपल्याला मिळाले,हे आपले भाग्य आहे. बदलापूरच्या घटनेनंतर निघालेल्या मोर्चाचे तसेच मणिपूर मधील महिला अत्याचाराच्या विरोधातील मोर्चाचेही नेतृत्व सुलक्षणा यांनी केले, त्याचवेळी महिलांच्या हक्कांसाठी,अधिकारासाठी सातत्यपूर्ण लढण्याची तयारी असलेले हे नेतृत्व आहे हे लक्षात आले होते. पिंपरी चिंचवड शहरातील प्रश्नांची जाण असल्याने त्यांना विजयी करण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे,असे ते म्ह+णाले.

कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहात सुलक्षणा यांनी रॅलीव्दारे उमेदवारी अर्ज दाखल केला.यावेळी कार्यकर्ते दुचाकी व चार चाकी गाड्यांमधून महेशनगर, संत तुकारामनगर येथून निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयापर्यंत आले होते.त्यांच्या हातात शरद पवार,हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खा. कोल्हे, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, आपचे प्रमुख,दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच सुलक्षणा यांच्या प्रतिमा होत्या.पिंपरी चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सुलक्षणा यांनी पुष्पहार घातला. त्यांचा अर्ज भरताना खा.कोल्हे, मानव कांबळे,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे,युवक अध्यक्ष इम्रान शेख,वरिष्ठ उपाध्यक्ष धम्मराज साळवे ,चिंचवड विधानसभा अध्यक्ष सागर चिंचवडे,नेते माजी नगरसेवक शंकर पांढरकर,आपच्या शहराध्यक्ष मीना जावळे आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *