जोरदार शक्तीप्रदर्शन करीत चिंचवडमधून नाना काटेंनी केली उमेदवारी दाखल
उत्तम कुटे,संपादक
पिंपरी : चिंचवड विधानसभेत महायुतीत बंडखोरी झाल्याचे काल स्पष्ट झाले.युतीतील अजित पवार राष्ट्रवादीचे नाना काटे यांना तिकिट न मिळाल्याने त्यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत अपक्ष अर्ज भरला.त्यामुळे तूर्तास तेथील लढत थेट राहिलेली नाही.
काटे यांनी गेल्यावर्षी चिंचवडची पोटनिवडणूक आघाडीकडून राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून लढवली होती.त्यावेळी तिरंगी लढतीतील मतविभागणीचा त्यांना फटका बसला.तरी त्यांनी लाखभर मते घेतली.त्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादीत फूट पडली. काटे अजितदादांसोबत गेले.ते यावेळी पुन्हा चिंचवडमधून इच्छूक होते. पण,जिथे ज्याचा आमदार ती जागा त्या पक्षाची असे महायुतीत जागावाटपाचे सूत्र ठरल्याने चिंचवडला आमदार असलेल्या भाजपकडे ही जागा गेली.तेथे शंकर जगताप यांना उमेदवारी मिळाली.त्यामुळे शरद पवार राष्ट्रवादी म्हणजे आघाडीकडून तिकिट मिळविण्याचा काटेंनी प्रयत्न केला.मात्र,तो ही फसला.कारण आघाडीने तेथे राहूल कलाटेंना तिकिट दिले.त्यामुळे चिंचवडच्या दोन निवडणुका लढण्याच्या अनुभव असलेले काटे यांनी अपक्ष लढण्याचे ठरवले. तसा अर्जही भरला.त्यामुळे चिंचवडची लढत दुरंगी न राहता ती बहूरंगी झाली आहे.तिचा फायदा काटेंना मिळून ते गेल्यावर्षीच्या पराभवाचे उट्टे काढतात का हे निकालानंतर कळणार आहे.पण,त्यासाठी ते रिंगणात
राहणे गरजेचे आहे.४ तारखेपर्यंत माघार न घेता ते उमेदवार म्हणून राहिले,तर पिंपरी महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपद भुषविल्याचा त्यांना थोडा फायदा या निव़डणुकीत मिळू शकतो.
जनता आपल्यासोबत असल्याने आपल्यासाठी ही लढाई अवघड नाही. त्यामुळे महाविकास आघाडीचे कलाटे व महायुतीचे जगताप या उमेदवारांचं आव्हान आपणं मानत नाही,असे काटे यांनी अर्ज भरल्यानंतर सांगितले.चिंचवडची जागा लायकी नसलेल्या आणि ज्यांचं डिपोझिट जप्त झालं होतं अशा उमेदवाराला आघाडीने दिली आहे,असा हल्लाबोल त्यांनी कलाटेंचं नाव न घेता केला.त्यामुळे चिंचवडच्या सर्वांगीण विकासासाठी मी मैदानात उतरलो आहे,असे ते म्हणाले. महायुतीचे तिकीट जाहीर झाल्यावर मी ते महाविकास आघाडीकडे मागितले होते. पण वरच्या नेत्यांना अंधारात ठेऊन खालच्या नेत्यांनी कलाटे यांना ते दिले,असा गंभीर आरोप त्यांनी केला.त्यांचा रोख हा शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंकडे होता. पोटनिवडणुकीत माझ्यासोबत एक लाख मतदार होते. याच मतदारांच्या विश्वासावर मी यावेळची निवडणूक जिंकेल असा दावा काटेंनी केला.
दरम्यान,पिंपळे सौदागरच्या महादेव मंदिरात दर्शन घेऊन काटे यांच्या रॅलीची सुरवात झाली.त्यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, विनोद नढे, संतोष कोकणे, उषा काळे, हरिभाऊ तिकोणे, खंडू कोकणे, शिरीष साठे, शेखर काटे, शाम जगताप,सचिन काळे, तानाजी जवळकर, नवनाथ नढे, चद्रकांत तापकीर, बापु कातळे, विष्णु शेळके, सागर कोकणे, संगिता कोकणे, प्रशांत सपकाळ, सुमित डोळस, काळुराम कवितके आदी त्यात सामील झाले होते.रॅलीचे फटाके फोडत, फुलांची उधळण करत चौकाचौकात स्वागत केले गेले.

