शिवरायांचे दर्शन घेत हजारोंच्या गर्दीत अजित गव्हाणेंनी दाखल केली उमेदवारी
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीःआघाडीचे (शरद पवार राष्ट्रवादी) उमेदवार अजित गव्हाणे यांनी मोठं शक्तीप्रदर्शन करीत सोमवारी (ता.२८)भोसरीत उमेदवारी अर्ज भरला. यावेळी त्यांच्या पक्षाचीच नाही,तर आघाडीचीही मुलूखमैदान तोफ,स्टार प्रचारक व स्थानिक खासदार शिरुरचे डॉ. अमोल कोल्हे खास उपस्थित होते.गव्हाणेंच्या पदयात्रेतील हजारोंची उपस्थिती ही भोसरीतील परिवर्तनाची नांदी असल्याचा दावा त्यांच्या अनेक समर्थकांनी यावेळी केला.
आघाडीच्या शहरातील तीन उमेदवारांपैकी फक्त गव्हाणेंनी सोमवारी उमेदवारी दाखल केली. चिंचवडमधील राहूल कलाटे (शिवसेना) आणि पिंपरीतील सुलक्षणा शिलवंत-धर हे आज (ता.२९) ती दाखल करणार आहेत.तर,गव्हाणेंचे मुख्य प्रतिस्पर्धी
महायुतीचे उमेदवार आणि भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे हे ही आजच उमेदवारी अर्ज भरणार आहेत.गव्हाणेंनी
भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ महाराजांच्या चरणी श्रीफळ वाढविले.नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन त्यांनी अर्ज दाखल केला. त्यावेळी खा.कोल्हेंसह भोसरीचे प्रथम आमदार विलास लांडे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तुषार कामठे उपस्थित होते.त्यापूर्वी त्यांच्या मिरवणुकीवर फुलांची मुक्तहस्ते उधळण केली गेली.रांगोळीच्या पायघड्या घालण्यात आल्या.फटाक्यांची आतिषबाजी झाली. भोसरी गावठाण, भैरवनाथ मंदिर, समस्त गव्हाणे तालीम, समस्त फुगे माने तालीम,मारुती मंदिर व भोसरी उड्डाणपूल अशी पदयात्रेची सांगता झाली.
नगरसेवकपदाच्या चार निवडणुका लढलेलेच नाही,तर त्या जिंकलेलेही गव्हाणे यांची आमदारकी लढण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र,त्यात त्यांना भाजपच्या गेल्या टर्ममधील काही माजी नगरसेवकांची साथ लाभली असून ते गव्हाणेंचा उघड प्रचार करीत आहेत.त्यात भोसरीतील काही माजी भाजप नगरसेवकांनी राजीनामा देऊन आघाडी पक्षात प्रवेश केला आहे.त्यामुळे गव्हाणेंना बारा हत्तीचे बळ मिळाले आहे.तर,लोकसभेला राज्यात आघाडीला घवघवीत य़श मिळाल्याने आता विधानसभेला भोसरीत परिवर्तन घडवू,असा दावा त्यांनी अर्ज भरल्यानंतर केला.त्यात त्यांना त्यांच्या मित्रपक्षांची साथ मिळाली,तर तसे घडू शकते.त्यामुळेच त्यांनी गेले दोन टर्म आमदार असलेल्या लांडगेंची हॅटट्रिक यावेळी हुकवू,असा दावा केला आहे.स्थायी समिती अध्यक्षपदाच्याच नाही,तर नगरसेवकपदाच्या वीस वर्षाच्या काळात कुठल्याही वादात न अडकणे ही बाब त्यांच्या दृष्टीने मोठी जमेची ठरणार आहे.गेल्या पाच वर्षात पिंपरी पालिकेत सत्ताधारी भाजपने केलेला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि दडपशाहीविरुद्ध त्यांनी उठवलेला आवाजही त्यांच्या पथ्यावर पडू शकतो.तो खरंच पडतो हे मतदार ठरवणार असून त्याचा निकाल २३ नोव्हेंबरला कळणार आहे.