पिंपरीत तिसऱ्या आघाडीची एंट्री,संभाजीराजेंच्या उपस्थितीत उद्या अर्ज भरणार
उत्तम कुटे,संपादक
पिंपरीः निवडणूक जशी जवळ येत चालली आहे,तसे पिंपरी-चिंचवडच नाही,तर राज्यभरातील राजकारणात मोठे ट्विस्ट येत आहेत. इनकमिंग,आऊटगोईंग जोरात सुरु झाले आहे. त्यात पिंपरी राखीव मतदारसंघात आज युतीला झटका बसला.भाजपचे सहयोगी आरपीआयचे (आठवले गट) माजी नगरसेवक बाळासाहेब ओहाळ यांनी साथ सोडत संभाजीराजेंच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश केला. लगेच त्यांना त्यांच्याकडून (तिसरी आघाडी) पिंपरीची उमेदवारी देण्यात आली.
ओव्हाळ हे युतीकडून(आरपीआय) इच्छूक होते.मात्र, पिंपरीच नाही,तर राज्यातही आरपीआयला एकही जागा युतीत मिळाली नाही.त्यामुळे त्यांनी पक्षाला रामराम करीत तिसऱ्या आघाडीतील महाराष्ट्र स्वराज्य पक्षात दुपारी प्रवेश केला.त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे माजी शहराध्यक्ष विनोद कांबळे व कार्यकर्त्यांनीही तिसरी आघाडी पर्याय निवडला. प्रवेशानंतर ओव्हाळांना लगेच एबी फॉर्मही मिळाला. उद्या सकाळी ते संभाजीराजेंच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरणार आहेत.दरम्यान, एकही जागा न सुटल्याने संतप्त झालेल्या आऱपीआय़च्या राज्यभरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची परवा मुंबईत बैठक झाली.त्यात किमान दोन जागा २८ तारखेपर्यंत दिल्या नाहीत,तर युतीचे काम करणार नाही,असा इशारा देण्यात आला आहे.दरम्यान,त्यानंतर ओव्हाळांनी थेट पक्षच सोडल्याने आरपीआयमध्ये जागा न मिळाल्याने किती संतप्त भावना आहेत,हे स्पष्ट झाले.
माझी बहिण,माझी ताकद अशी घोषणा ओव्हाळ यांनी उमेदवारीची घोषणा झाल्यावर लगेच दिली.पिंपरीत बदल हवा असून त्यासाठी नवीन माझा पक्ष आणि माझा नवीन चेहरा हा चांगला पर्याय असून पेनाची निप हे आपले चिन्ह असणार असल्याचे त्यांनी सांगितले.दोन्ही आघाड्यात (युती आणि आघाडी) बिघाड्या झाल्याने परिवर्तनाच्या तिसऱ्या आघाडीचा पर्याय आपण निवडला,असे ते म्हणाले.पिंपरीतील नाराज युतीतील गटाचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.