उत्तम कुटे
पिंपरीःयुतीतील राष्ट्रवादीने आपले राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांसह आपले ३८ उमेदवार परवा (ता.२३)घोषित केले होते.त्यानंतर आज (ता.२५) त्यांनी सातजणांची आपली दुसरी यादी जाहीर केली.त्यात अपेक्षा नसल्याची चर्चा असलेले व पहिल्या यादीत डावलले गेलेले पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
दरम्यान,चारच दिवसांपूर्वी शिंदे शिवसेनेतून पक्षात आलेले ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके
यांना अजितदादांनी लगेच शिरुर-हवेलीतून उमेदवारी दिली.त्यामुळे या मतदारसंघातील त्यांच्या पक्षात काहीशी नाराजी पसरली आहे.२१ तारखेला शिंदे शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख असलेल्या कटकेंनी उमेदवारीसाठीच राष्ट्रवादीत प्रवेश केला अन चारच दिवसांत त्यांनी ती मिळवलीही. त्यामुळे आता शिरुरमध्ये दोन्ही राष्ट्रवादीतच (शरद पवारांचे विद्यमान आमदार अशोक पवार आणि अजित पवारांचे कटके) अशीच लढत थेट होणार आहे.दुसरीकडे,तर आजच कॉंग्रेसमधून पक्षात आलेले मुंबईतील वांद्रे (पूर्व) चे आमदार झिशान सिद्दीकी यांना सुद्धा राष्ट्रवादीने लगेचच काही तासांत तिकिट दिले.शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा मातोश्री हा बंगला या मतदारसंघात येतो.तो २०१९ पर्यंत शिवसेनेचाच बालेकिल्ला होता.पण, एका चुकीमुळे तो त्यावेळी निसटला अन सिद्दीकी तेथून कॉंग्रेसचे आमदार झाले.नुकतेच हत्या झालेले बाबा सिद्दीकी यांचे ते चिरंजीव आहेत.हत्येपूर्वी काही महिने अगोदरच बाबा सिद्दीकी यांनीही राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.तर, कॉंग्रेसने तिकिट कापल्याने झिशान यांनी सुद्धा आज पक्षाला रामराम ठोकला अन राष्ट्रवादीत प्रवेश करीत काही तासांत उमेदवारीही मिळवली.ठाकरेंनी हा आपला गड पुन्हा जिंकण्यासाठी तेथे आपल्या नात्यातीलच तरुण चेहरा वरुण सरदेसाई यांना सिद्दींकीविरद्ध उभे केले आहे.त्यातून तेथे दोन तरुणांत अटीतटीची लढत होणार असून गेलेला हा गड सरदेसाई परत मिळवतात याकडे लक्ष लागले आहे.
पुणे पोर्शे कार अपघातात पोलिस ठाण्यात जाऊन त्या गुन्ह्यातील आरोपींची बाजू घेतल्याचा ठपका टिंगरेवर होता. त्यामुळे या गाजलेल्या वादग्रस्त प्रकरणात नाव आल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही,अशी शंका उपस्थित करण्यात आली होती.मात्र,अजितदादांकडे तेथे आघाडीचे (शरद पवार गट) बापूसाहेब पठारे यांच्याविरुद्ध तुल्यबळ उमेदवार नव्हता. त्यामुळे त्यांनी पुन्हा टिंगरेंनाच संधी दिली.ती ते साधतात की चुकवितात हे २३ नोव्हेंबरलाच कळणार आहे.
माफियाशी सबंधित तसेच मनी लॉंड्रिंगच्या गुन्ह्यात तुरुंगात जाऊन आलेले अजितदादांचे माजी मंत्री नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपचा कडाडून विरोध होता.त्यामुळे त्यांना त्यांच्या मुंबईतील अणुशक्तीनगरमधून पुन्हा तिकिट देण्यात आले नाही.मात्र,त्यांची कन्या सना मलिक हिला उमेदवारी देत आपल्या मित्र पक्षांसारखी राष्ट्रवादीनेही घराणेशाही पुढे सुरुच ठेवली आहे.