युतीचे १८२,तर आघा़डीचे १५२ उमेदवार जाहीर,आता प्रतिक्षा दुसऱ्या यादीची
उत्तम कुटे
पिंपरीःयुतीत भाजपने वीस तारखेला प्रथम आपल्या ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.त्यानंतर त्यांचे दोन मित्रपक्ष शिवसेना,राष्ट्रवादीची ती आली.त्या तिघांनी मिळून १८२ उमेदवार आतापर्यंत दिले आहेत.त्यानंतर आघाडीत कॉंग्रेसने आपले ४८ उमेदवार गुरुवारी (ता.२४) रात्री घोषित केले.त्यातून आघाडीचेही पहिल्या टप्यातील उमेदवारांचे वर्तूळ पूर्ण केले.
कॉंग्रेसनेही आपले दोन पक्ष आणि युतीप्रमाणे वादाच्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागांवर उमेदवार पहिल्या टप्यात घोषित केले नाहीत.या जागा प्रथम कोणी लढवायच्या यावरून युती आणि आघाडीत मतभेद होते. ते मिटल्यानंतर तेथे उमेदवार कोण असावा या घोळातून त्यांची नावे जाहीर झालेली नाहीत.दरम्यान,गेल्यावर्षी भाजपच्या पुण्यातील कसबा पेठ या बालेकिल्याला पोटनिवडणुकीत खिंडार पाडलेले रविंद्र धंगेकर यांना पुन्हा तेथून उमेदवारी देण्यात आली आहे.मात्र,तेथे भाजपने पहिल्या यादीत उमेदवार दिलेला नाही.त्यामुळे तेथे धंगेकरांचा यावेळी सामना कोणाशी होणार हे तूर्त स्पष्ट झालेले नाही.
कॉंग्रेसने चार महिला आणि तेवढ्याच अल्पसंख्याकांना पहिल्या यादीत स्थान दिले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या मातब्बरांना पहिल्याच टप्यात उमेदवारी दिली. कॉंग्रेसनेही भाजप,शिवसेनेसारखी घराणेशाही उमेदवारी देताना सुरु ठेवली.मुंबईतील धारावीच्या आमदार वर्षा एकनाथ गायकवाड या लोकसभेला खासदार झाल्यानंतर त्यांच्या जागी डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. लातूर ग्रामीण आणि लातूर शहर येथे अनुक्रमे धीरज विलासराव देशमुख आणि अमित विलासराव देशमुख या भावांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.भोरवर थोपटेंनी आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.तेथे पुन्हा संग्राम अनंतराव थोपटेंनाच तिकीट दिले गेले आहे.