दहा हजाराची लाच मागितल्याने शिरुर पोलिस ठाण्याचा फौजदार माणिक मांडगेवर गुन्हा
उत्तम कुटे
पिंपरीःपुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा कारवाईचा धडाका सुरुच आहे. काल (ता.२३) त्यांनी महावितरणचे पुण्यातील बंडगार्डन विभागाचा कार्यकारी अभियंता भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) या क्लास वन अधिकाऱ्याला दोन लाख रुपयांच्या लाचेचा पहिला हफ्ता घेताना त्याच्याच कार्यालयात पकडले होते.तर आज (ता.२४) त्यांनी शिरुर पोलिस ठाण्यातील फौजदार (पीएसआय़) माणिक बाळासाहेब मांडगे याला दणका दिला.
टाकळी हाजी (ता.शिरुर,जि.पुणे) पोलिस चौकीतच दहा हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याबद्दल मांडगेविरुद्ध तो नेमणुकीस असलेल्या शिरुर पोलिस ठाण्यातच लाचखोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला.सुभाष मुंजाळ (रा. कवठे यमाई,ता.शिरुर) या मध्यस्थ खासगी व्यक्तीलाही त्यात आरोपी करण्यात आले आहे.यात एसीबीकडे तक्रार केलेल्या व्यक्तीच्या मुलाच्या विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.त्यात त्याला अटक न करता मदत करण्यासाठी मांडगेने २५ हजाराची लाच मागितली.तसेच मुंजाळ याच्याशी पुढील बोलणी करण्यास तक्रारदाराला सांगितले होते.त्यानुसार मुंजाळने दहा हजाराच्या लाचेची मागणी साहेबांसाठी केली.त्याला मांडगेनेही दुजोरा दिल्याचे दिसून आले.एसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीप निंबाळकर या प्रकरणी पुढील तपास करीत आहेत.