उत्तम कुटे
पिंपरीःबुधवारी (ता.२३) मावळच्या राजकारणात दोन भूंकप झाले.युतीकडून तेथे अजित पवार राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळकेंच्या उमेदवारीची घोषणा होताच त्या पक्षाचे तेथील इच्छूक आणि प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष लढण्याची घोषणा केली.त्यानंतर तीन तासांत शेळकेंच्या उमेदवारीच्या निषेधार्थ भाजपच्या तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी आपले सामूहिक राजीनामे दिले.एवढेच नाही,तर त्यांनी बापू भेगडेंचे काम करण्याचा निर्णयही घेतला.
मावळ भाजपची बंडखोरी,त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे आणि शेळकेंचे काम न करता ते अपक्षा बापू भेगडेंचे करण्याचा घेतलेला निर्णय यामुळे तुर्तास,तरी तेथे अपक्षाचे पारडे जड चांगले. झाले आहे.शेळकेंची उमेदवारी दुपारी जाहीर होताच त्याच्याविरोधात लगेच चार वाजता बापू भेगडेंनी पत्रकारपरिषदेत पदाचा राजीनामा देत अपक्ष लढण्याची घोषणा केली. त्यानंतर तीन तासांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शेळकेंच्या उमेदवारी विरोधात मावळ तालुक्याची कोअर कमिटी आणि सर्व पदाधिकाऱ्यांची पत्रकारपरिषद घेत सामूहिक राजीनाम्याची घोषणा केली.एवढेच नाही,तर अपक्ष बापू भेगडेंचं काम करणार असल्याचे जाहीर केले.एवढेच नाही,तर त्यांना निवडूनही आणणार असल्याचा दावा त्यांनी केला.
बापू भेगडेंप्रमाणे बाळा भेगडेही त्यांच्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत.छातीवर दगड ठेवून पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेत असल्याचे सांगताना बाळा भेगडेंना अश्रू अनावर झाले होते.भाजपला मावळात संपविण्याचे काम गेल्या पाच वर्षात करणाऱ्या शेळकेंना उमेदवारी दिल्याने नाईलाजाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.लोकसभेला आमचे झाले नाहीत,त्यांचे काम विधानसभेला का करायचे अशी शेळकेंविरोधी भूमिका त्यांनी मांडली.युतीधर्म काय फक्त आम्हीच पाळायचा का,अशी विचारणाही त्यांनी केली.