तिन्ही अण्णा फिक्स असल्याची आपला आवाजची बातमी चारच दिवसांत खरी ठरली

पुणे जिल्ह्यातील तिन्ही आमदार अण्णांवर अजितदादांचा पुन्हा विश्वास,तो सार्थ होणार का?

उत्तम कुटे
पिंपरीःअजित पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्ह्यातील तीन आमदार अण्णांची (पिंपरीचे अण्णा बनसोडे,मावळचे सुनीलअण्णा शेळके आणि खेडचे दिलीपअण्णा मोहिते-पाटील) उमेदवारी फिक्स असून त्यांच्या नावाची घोषणाच काय ती बाकी आहे,या आशयाची बातमी आपला आवाजने १९ ऑक्टोबरला दिली होती.ती चार दिवसांतच खरी ठरली.कारण या तिघांनाही आज उमेदवारी जाहीर झाली.

मोहिते हे २००९ ला प्रथम खेड-आळंदीतून आमदार झाले. मात्र,त्यांचे झाडून सारे विरोधक २०१४ ला एक झाल्याने त्यावेळी त्यांची ही संधी हुकली होती.त्याची कसर त्यांनी २०१९ ला भरून काढली.आता ते पुन्हा चौथ्यांदा रिंगणात आहेत.तर, पिंपरीचे बनसोडे हे ही २००९ ला प्रथम आमदार झाले. २०१४ ला त्यांचाही पराभव झाला होता.२०१९ ला ते पुन्हा निवडून आले.तर,शेळके हे गेल्यावेळी प्रथमच विधानसभेला निवडून आले असून यावेळची त्यांची ही दुसरी निवडणूक आहे.ते दुसऱ्यांदा आणि बाकीचे दोन अण्णा तिसर्यांदा आमदार होतात,हे पुढील महिन्याच्या २३ तारखेला कळणार आहे.

दरम्यान,अजितदादांनी या तीन अण्णांवर टाकलेला विश्वास ते सार्थ ठरविणार का हे पाहणे आता रंजक ठरणार आहे.कारण यावेळी तिन्ही अण्णांची वाट विविध कारणांमुळे काहीशी बिकट झालेली आहे.खेडच्या अण्णांचे सारे विरोधक यावेळी २०१४ सारखे पुन्हा एक झाले आहेत.त्याची चुणूक त्यांनी नुकतीच दाखवली. खेड तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती,उपसभापती निवडणुकीत त्यांनी दिलीपअण्णा मोहिते गटाचा सपशेल पराभव केला.त्यातून या गटाचा आमदारकीला हुरूप वाढला आहे पिंपरीतील अण्णांची सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती आहे. या मतदारसंघातील पक्षाच्याच नव्हे,तर युतीतीलही अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा गट अण्णा बनसोडेंविरुद्ध नाराज आहे.बनसोडेंना उमेदवारी दिली,तर त्यांचे काम करणार नाही, असा इशारा त्यांनी कालच शपथ घेऊन दिला होता.त्यानंतरही बनसोडेंनाच तिकिट मिळाल्याने हा गट जास्तच नाराज झाला आहे. आम्हाला विश्वासात न घेता विरोध असलेल्या अकार्यक्षम बनसोडेंनाच पुन्हा उमेदवारी जाहीर केल्याने आता माघार नाही,असे सांगत पुढील दिशा काय असेल,हे आज वा उद्याच ठरवू,असे या गटाचे एक म्होरके आणि इच्छूक असलेले माजी नगरसेवक जितेंद्र ननावरे यांनी थोड्या वेळापूर्वी आपला आवाजला सांगितले.तर, मावळच्या सुनीलअण्णांना तिकिट मिळालेल्या मावळच्या जागेवर भाजपनेही दावा केलेला होता. तेथून त्यांचे रविंद्र भेगडे यांनी जोरात तयारी सुरु केली होती.त्यामुळे ते व त्यांना पाठिंबा असलेला भाजपमधील शेळके विरोधी गट युतीचा धर्म पाळतात की बंडखोरी करतात,याकडे लक्ष लागले आहे.दुसरीकडे
राष्ट्रवादीतील मावळातील बडं प्रस्थ बापूसाहेब भेगडे महामंडळ नाकारीत उमेदवारीवर ठाम असून अपक्ष वा आघाडीकडून लढण्याच्या तयारीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *