अजितदादांचं ठरलं,बारामतीतूनच लढणार,तेथे पवार विरुद्ध पवारच लढत होणार
उत्तम कुटे
पिंपरीःयुतीतील भाजपने आपली ९९ जणांची पहिली यादी २० तारखेला जाहीर केली.काल (ता.२२) रात्री उशीरा शिवसेनेने ४५ उमेदवार घोषित केले.तर,आज (ता.२३) राष्ट्रवादीनेही आपल्या ३८ उमेदवारांची घोषणा केली.त्यामुळे युतीने २८८ पैकी १८२ उमेदवार जाहीर केले असून वादाचे १०२ करणे बाकी ठेवले आहेत.
युतीतील तिन्ही पक्षांनी आपले बहूतांश मंत्री,आमदार यांना पहिल्याच यादीत स्थान दिले आहे.मात्र,एकमेकांच्या जागांवर दावा केलेल्या,अदलाबदल होऊ शकेल अशा वादाच्या जागा मागे ठेवल्या आहेत.दरम्यान, राष्ट्रवादीने आपली यादी जाहीर करून अनेक चर्चांवर पडदा टाकला.त्यातही बारामतीतून अजित पवार लढणार की नाही,याला त्यांनी पूर्णविराम दिला.लोकसभेला त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांचा पराभव झाल्याने विधानसभेला बारामतीतून अजितदादा लढणार नसून ते सेफ मतदारसंघाचा शोध घेत आहेत, शिरुरमधून ते उभे राहू शकतात,अशा चर्चा रंगल्या होत्या.त्यावर अखेर पडदा पडला.
प्रदेशाध्यक्ष पिता खासदार तर,मंत्री मुलगी आमदारकीची पुन्हा उमेदवार
प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेला रायगडमधून निवडून आलेले सुनील तटकरे यांनी ही यादी जाहीर केली. त्यात त्यांची मुलगी आणि राज्याच्या महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचे नाव आहे.त्यातून भाजप,शिवसेनेनंतर युतीतील राष्ट्रवादीतही विधानसभा उमेदवारीत घराणेशाही पुढे सुरुच राहिल्याने दिसून आले आहे.अदिती यांना श्रीवर्धन (जि.रायगड) मधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.तर,त्यांचे वडिल रायगडचेच खासदार आहेत.छगन भुजबळ (येवला), धनजंय मुंडे (परळी), दिलीप वळसे पाटील (आंबेगाव),हसन मुश्रीफ (कागल), सारख्या मातब्बर मंत्र्यांना पुन्हा उमेदवारी मिळणारच होती अन ती मिळालीही.
पुण्यात हडपसरमधून विद्यमान आमदार चेतन तुपे-पाटील हेच पुन्हा उमेदवार असतील. मात्र,पुण्यातील बहूचर्चित हीट अॅन्ड रन प्रकरणात वादात सापडलेले वडगाव-शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांचे पहिल्या यादीत नाव नाही.त्यामुळे त्यांना पुन्हा तिकिट मिळणार की नाही,अशी चर्चा लगेच सुरु झाली आहे. पुण्यातील आठपैकी याच दोन जागा राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता आहे. पिंपरी-चिंचवडमधील युतीच्या तीनपैकी भोसरी (आमदार महेश लांडगे) आणि चिंचवडला (शंकर जगताप) भाजपने आपले अगोदरच उमेदवार घोषित केले आहेत.त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याच्या पिंपरीत तो जाहीर होणे बाकी होते. तेथे अपेक्षेनुसार विद्यमान आमदार आणि अजितदादांचे कट्टर समर्थक अण्णा बनसोडे यांना तिकिट मिळाले आहे.तर, जुन्नरमध्येही विद्यमान आमदारांनाच (अतुल बेनके) पुन्हा संधी देण्यात आली आहे.

