पुणे ग्रामीणमध्ये फक्त दौंड ठेवला भाजपने, बाकी ठिकाणी असणार राष्ट्रवादी व शिवसेना
उत्तम कुटे
पिंपरीःपुणे,पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात विधानसभेच्या २१ जागा आहेत.पण,भाजपचा ग्रामीणमध्ये १० पैकी फक्त एकच आमदार दौंडला राहूल कूल आहेत.त्यांनाच पहिल्या यादीत त्यांनी तिकिट दिले आहे.त्यामुळे तेथील बाकीच्या जागा मित्रपक्ष राष्ट्रवादी,शिवसेनेला सोडल्याची चर्चा आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह पुणे जिल्ह्यात भाजपचे आठ आमदार आहेत.त्यातील दोन उद्योगनगरीत भोसरी (महेश लांडगे) आणि चिंचवड (अश्विनी जगताप),तर पुण्यात पर्वती (माधुरी मिसाळ), शिवाजीनगर (सिद्धार्थ शिरोळे),कोथरुड (चंद्रकांत पाटील) खडकवासला (भीमराव तापकीर), पुणे कॅन्टोमेंट (सुनील कांबळे),तर ग्रामीणमध्ये दौंडला कूल असे आठ आमदार आहेत. त्यापैकी सहा आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.तर,पक्षांतर्गत विरोध असल्याने कॅन्टोमेंट,खडकवासल्यात उमेदवार भाजपने जाहीर केलेला नाही.त्यासह सध्या कॉंग्रेसचा आमदार असलेल्या कसब्यातील सस्पेन्सही तेथे अनेक इच्छूक असल्याने त्यांनी कायम ठेवला आहे.तर,वडगाव शेरी,हडपसर येथे मित्रपक्ष राष्ट्रवादीचा आमदार असल्याने त्या जागा त्यांनी त्यांना सोडल्या आहेत.लोकसभेला शिवाजीनगर मतदारसंघात युतीच्या उमदेवाराला (भाजपचे मुरलीधर मोहोळ) यांना अपेक्षेपेक्षा खूप कमी मताधिक्य मिळाल्याने तेथे पक्ष भाकरी फिरवेल,अशी शक्यता होती.तरीही तेथे शिरोळेंनाच पुन्हा संधी दिली गेली आहे,हे विशेष.तशीच ती कोथरुडला चंद्रकांतदादांना मिळणारच होती,याची फक्त घोषणाच बाकी होती.तर,आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या मिसाळांना चौकारासाठी तिकिट पुन्हा देण्यात आले आहे.
भोसरीत महेशदादांना उमेदवारी मिळणार हे नक्कीच होते.ती जाहीर झाल्याने त्यांना तेथे आमदारकीच्या हॅटट्रिकसाठी संधी चालून आली आहे.तर,चिंचवडला,मात्र भाजपने भाकरी फिरवली.पण,ती घरातच. तेथे सलग तीनदा लक्ष्मण जगताप आमदार होते.त्यांच्यानंतर त्यांच्या पत्नी अश्विनी या त्या झाल्या. तर,आता त्यांचे दीर आणि भाजपचे पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शंकर जगताप यांना तेथे उमेदवारी देण्यात आली आहे.दोनच दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर आलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे अश्विनी जगताप यांनी आपल्याला उमेदवारी नको,तर ती आपले दीर शंकर जगताप यांना द्या,अशी मागणी केली होती,हे विशेष.त्याची बातमी आपला आवाजने काल दिली.ती आज खरी झाली.शंकर जगताप निवडून आले,तर चिंचवडमध्ये आतापर्यंत जगताप कुटुंबातीलच आमदार असणार आहे.