काही आमदारांचा पत्ता कट करीत भाजपने दिली नव्यांना संधी,१३ महिला पहिल्या यादीत
उत्तम कुटे
पिंपरीःविधानसभेसाठी उमेदवारांची थोडीथोडकी नाही,तर तब्बल ९९ जणांची पहिली यादी सर्वात अगोदर जाहीर करीत भाजपने आघाडीवर आघाडी घेतली आहे.जागावाटपातही त्यांनी ती घेतली होती.मतदानाच्या बरोबर एक महिना अगोदर आपले उमेदवार जाहीर करून त्यांना भाजपने प्रचारासाठी पुरेसा वेळ देण्याचा प्रयत्न केला आहे. काही विद्यमान आमदारांचा पत्ता कट करण्यात येऊन तेथे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची खेळी करण्यात आली आहे.तसेच पहिल्या यादीत १३ महिला असून हे प्रमाण १० टक्के आहे.
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची १६ ऑक्टोबरला झालेल्या बैठकीतच ही यादी निश्चीत करण्यात आली होती.मात्र,तिची घोषणा चार दिवसानंतर झाली.त्यात पहिलंच नाव हे पक्षाचे महाराष्ट्रातील कॅप्टन आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे.ते दक्षिण पश्चिम नागपूरमधून उमेदवार कायम असणार आहेत.तर,दुसऱ्या स्थानी गेल्यावेळी डावलले गेलेले व सध्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आहेत.त्यांना कामठीमधून तिकिट देण्यात आले आहे.पक्षाचे संकटमोचक आणि फडणवीसांचे अत्यंत विश्वासू गिरीश महाजन या कॅबिनेट मंत्र्यांकडे जामनेर कायम ठेवले गेले आहे.सुधीर मुनंगटीवार,रविंद्र चव्हाण,मंगलप्रभात लोढा,चंद्रकांत पाटील,राधाकृष्ण विखे-पाटील आदी कॅबिनेट मंत्र्यांनाही पुन्हा संधी दिली गेली आहे.
घराणेशाहीला विरोध असलेल्या भाजपमध्येच ती रुजतेय
भाजप आणि त्यांचे केंद्रातील ज्येष्ठ नेते हे घराणेशाहीवरून कॉंग्रेस त्यातही गांधी घराण्यावर सडकून टीका करीत असतात.मात्र,लोकसभेनंतर त्यांनीच विधानसभेतही उमेदवारी देताना घराणेशाही सुरुच ठेवली आहे.कॉंग्रेसमधून भाजपमध्ये येऊन लगेच खासदार झालेले अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया यांनाही भोकरमधून विधासभेची उमेदवारी लगेच त्यांनी दिली.तसेच लोकसभेला पराभूत झालेले माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब यांचे चिरंजीव संतोष यांना भोकर,तर ज्येष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचा मुलगा आकाश याला खामगावमधून तिकिट दिले आहे.दत्ता मेघेंचे चिरंजीव समीर मेघे यांनाही हिंगणातून उमेदवारी दिली आहे.
आता गणेश नाईक भाजप सोडणार का?
नवी मुंबईतील एक बडं प्रस्थ आणि युती माजी मंत्री गणेश नाईक हे उमेदवारी मिळणार नसल्याने भाजप सोडण्याच्या तयारीत होते.त्यांनी तुतारी फुंकण्याची तयारी केली होती.मात्र त्यांना तिकिट देण्यात आल्याने ते आता पक्ष सोडण्याची शक्यता नाही.फक्त बेलापूरऐवजी त्यांना ऐरोलीतून उमेदवारी देण्यात आली आहे.त्यांच्या पक्षांतर्गत विरोधक मंदा म्हात्रे यांना त्यांचाच बेलापूर कायम ठेवण्यात आला आहे.नाईक हे बेलापूरमधून इच्छूक होते.त्यांना व म्हात्रे अशा दोघांनाही तिकिट देऊन भाजपने नवी मुंबईतील तिढा आपल्या परीने मिटवला आहे.

