विधानसभेलाही शरद पवार हे अजितदादांना आंबेगाव-शिरुरमध्ये धक्का देणार ?
उत्तम कुटे
पिंपरीःउत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव-शिरुर मतदारसंघात यावेळी युतीकडून (अजित पवार राष्ट्रवादी) विद्यमान आमदार आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची उमेदवारी निश्चीत आहे.मात्र,त्यांची वाट अनेक कारणामुळे बिकट झाल्याची चर्चा आहे.त्यात स्वतासह आपल्या साहेबांची (शरद पवार)पत टिकविण्यासाठी शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हेंनी या मतदारसंघात सर्वस्व पणास लावले असून ही बाब वळसेंच्या विजयात अडसर ठरू शकते.
वळसेंचा यावेळी पराभव होऊ शकेल यातील पहिले कारण म्हणजे त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने विकासापासून वंचित राहिलेला पश्चिम पट्यातील आदीवासी.दुसरीकडे या मतदारांवर आंबेगावपासून जुन्नरपर्यंत शरद पवार यांचा करिष्मा आहे.निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जु्न्नरला त्यांचा मेळावा पवारांनी घेतला.त्याला वळसेंची गैरहजेरी चर्चेचा विषय ठरली होती. दुसरं महत्वाचं आणि मोठं कारण वळसे हे सुरुवातीला शरद पवारांचे स्वीय सहाय्यक (पीए) होते.त्यानंतर त्यांना शरद पवारांनी एकदा नाही,तर सातवेळा आमदार केले.विविध मंत्रीपदे दिली. विधानसभेचे अध्यक्ष केलं.तरीही त्यांनी त्यांची साथ सोडली.याचा राग शरद पवारांना मानणाऱ्या आंबेगाव-शिरुरमध्ये मोठ्या संख्येने असलेल्या मतदारांत आहे.तो ते यावेळी मतदानातून डॉ.कोल्हे हे बाहेर काढायला काढतील,असा अंदाज आहे.
सातवेळा आमदार राहिल्याने आंबेगावकरांना आता नवीन चेहरा हवा आहे.त्यातही शिरुर तालुक्यातील ३७ गावांना आपल्या भागातीलही आमदार व्हावा,असे आता वाटू लागले आहे.
३४ वर्षे एकच व्यक्ती आमदार असल्याने अॅन्टी इन्कंबन्सीचा फटका वळसेंना बसू शकतो. चार महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेला आघाडीचे डॉ.अमोल कोल्हे येथून पुन्हा खासदार झाले.त्यांना वळसेच्या आंबेगावमध्ये १९,२५९ मतांचे लीड मिळाले होते. ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. विजयानंतर त्यांनी आपल्या साहेबांना सोडून गेलेल्या प्रत्येक आमदाराला धडा शिकविण्याचा निर्धार केला आहे.त्याचा श्रीगणेशा आपल्या मतदारसंघापासून (जुन्नर, खेड-आळंदी,हडपसर,आंबेगाव) ते करणार हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.त्यांचा आंबेगावच नाही,तर संपूर्ण उत्तर पुणे जिल्ह्यात मोठा करिष्मा कायम असल्याचे लोकसभेला पुन्हा दिसले आहे.तसेच आपल्या मतदारसंघात आपले आमदार निवडून आणण्यास त्यांचे प्रथम प्राधान्य राहणार यात शंका नाही.ही बाब वळसेंच्या मार्गात अडथळा ठरू शकते. त्यात त्यांची प्रकृती आता त्यांना अपेक्षत साथ देत नाही,याचा विचार मतदार करतील हा सुद्धा त्यांच्या दृष्टीने मायनस पॉंईट असणार आहे.
लोकसभेला राज्यातील वातावरण फिरले असून तशी काहीशी स्थिती अद्याप कायम आहे. वळसेंच्या मतदारसंघात आघाडीतील राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेनेची मोठी ताकद आहे. त्यांना कॉंग्रेसची साथ मिळून आघाडीची वज्रमूठ झाली आणि कारणांतून यावेळी वळसेंचा पराभवही होऊ शकतो,असे वातावरण आहे.त्यामुळे वळसेंचा पराभव होणार की शरद पवारांची साथ सोडूनही ते विजयी होणार,हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.