ठाकरे शिवसेनेला चिंचवड नको,तर पिंपरी हवे,मग भोंडवेंचं काय होणार?

चिंचवडमधून आघाडीचे उमेदवार कलाटे असू शकतात आणि ते ही राष्ट्रवादीकडून?

उत्तम कुटे
पिंपरीःअजित पवार राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक मोरश्वर भोंडवे यांनी चिंचवडची उमेदवारी मिळावी म्हणून काल ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.त्यानंतर त्यांना चिंचवडमधून आघाडीचे तिकिट मिळणार अशी चर्चा सुरु झाली.त्यानंतर पिंपरी-चिंचवड शिवसेनेत भूकंपच झाला. त्यांनी तातडीने बैठक घेत राजीनाम्याचाच इशारा दिला.

दरम्यान,शिवसेनेतील संताप व चिंचवडमधील पक्षाची तोळामासा ताकद पाहता भोंडवेंना तेथे आघाडीची म्हणजे शिवसेनेची उमेदवारी मिळेल की नाही याविषयी राजकीय तज्ज्ञांना शंका वाटते आहे.कारण ती शिवसेनेच्या दृष्टीने हरणारी जागा आहे.त्यामुळेच ती न घेता जिंकणारी पिंपरीची घ्या,अशी मागणी कालच थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडेच करण्यात आली.पिंपरीचे शिवसे नेचे माजीआमदार अॅड. गौतम चाबूकस्वार यांनी ठाकरेंची भेट घेऊन ती केली.काल भोंडवेंच्या पक्ष प्रवेशाला ते मातोश्रीवर उपस्थित होते.त्यानंतर त्यांनी ठाकरेंची भेट घेतली.ते स्वत पिंपरीतून दावेदार आहेत.त्यावर पिंपरीच नाही,तर चिंचवडचंही फायनल झाले नसल्याचे त्यांना खुद्द ठाकरेंनी सांगितले.त्यातून भोंडवेंचा प्रवेश झाला असला,तरी त्यांची चिंचवडची शिवसेना उमेदवारी ही फिक्स झाली नसल्याचे संकेत मिळाले आहेत.

शहरातील तिन्ही जागांवरील य़ुतीचे उमेदवार जवळपास निश्चीत झाले आहेत.दुसरीकडे,मात्र आघाडीत जागावाटपाचाच घोळच सुरु आहे.ज्या पिंपरीवर शिवसेनेने दावा ठोकला आहे तेथे राष्ट्रवादीच्या सुलक्षणा शिलवंत-धर यांनी जोरात तयारी सुरु केली आहे.तर, भोंडवे शिवसेनेचे उमेदवार असतील अशी चर्चा असलेल्या चिंचवडला राष्ट्रवादीकडून राहूल कलाटेंचे नाव अचानक शेवटच्या क्षणी समोर येऊ शकते,असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. ते तेथून तीनदा लढलेले आहेत.त्यांचे आणि राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांचे जिव्हाळ्याचे सबंध आहेत.म्हणून त्यांना पक्षात घेऊन त्यांना तिकिट देण्यासाठी खा. कोल्हेंचे जोरदार प्रयत्न चालले असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.एकेक जागा जिंकणे हे युती आणि आघाडीच्या दृष्टीनेही यावेळी अत्यंत महत्वाचे असल्याने इलेक्टीव्ह मेरीटवरच त्यांनी उमेदवारी देण्याचे ठरवलेले आहे.त्यातूनच पिंपरी आणि चिंचवडमध्ये जागावाटपात आणि उमेदवारी देताना शेवटच्या क्षणी मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे.