पुणे जिल्ह्यातील तीन अण्णांची उमेदवारी फिक्स,पण निवडून कोण येणार?

उत्तम कुटे
पिंपरीः विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती आणि आघाडीतील जागावाटप तसेच उमेदवार निश्चीतीला वेग आला आहे.मात्र,अद्याप काही जागांवर तिढा असल्याने जागावाटप आणि किमान उमेदवारांची पहिली यादी अद्याप जाहीर झालेली नाही.मात्र, पुणे जिल्ह्यातील तीन आमदार अण्णांची उमेदवारी युतीकडून फिक्स असून त्यांच्या नावाची घोषणाच काय ती बाकी आहे.

नमूद करण्याजोगी बाब म्हणजे तिन्ही अण्णा राज्यातील सत्ताधारी अजित पवार राष्ट्रवादीचे आहेत.ते सलग दुसऱ्यांदा मैदानात उतरणार आहेत. त्यातील दोन अण्णा अजितदादांचे कट्टर समर्थक असून ते त्यांच्या बंडात शेवटपर्यंत राहिलेले आहेत.त्यातील पहिले अण्णा मावळचे आमदार अण्णा सुनील शेळके गेल्यावेळी २०१९ ला भाजपमधून येऊन राष्ट्रवादीचे आमदार झाले.यावेळीही त्यांचे तिकिट फिक्स असून फक्त घोषणा होणेच बाकी आहे.तर, खेड- आळंदीचे आमदार दिलीपअण्णा मोहिते-पाटील हे २००९ आणि २०१९ असे दोनदा आमदार राहिलेले आहेत. तसेच पिंपरीचे अण्णा बनसोडे हे ही २००९ आणि २०१९ ला विधानसभेवर निवडून आलेले आहेत.या दोन्ही अण्णांचा २०१४ ला शिवसेना उमेदवाराने पराभव केला.अन्यथा त्यांची २०१९ ला आमदारकीची हॅटट्रिक झाली असती.मोहितेंचा सुरेश गोरे,तर बनसोडेंचा शिवसेनेच्याच अॅड गौतम चाबूकस्वारांनी पराभव केला होता.मोहिते व बनसोडेंचीही यावेळी उमेदवारी नक्की झाल्यात जमा आहे.

अजित पवार राष्ट्रवादीच्या या तिन्ही अण्णा आमदारांचे प्रतिस्पर्धी यावेळी शरद पवार गटाचे असण्याची दाट शक्यता आहे.या गटाकडून पिंपरीत माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत- धर यांचे नाव आघाडीवर आहेत.या जागेवर आघाडीत शिवसेनेनेही दावा केला आहे.पण, त्यांना ती मिळण्याची शक्यता कमी आहे.शिलवंत तेथे उमेदवार असू शकतात. त्यांनाच गेल्यावेळीही २०१९ ला राष्ट्रवादीचे तिकिट जाहीर झाले होते. पण, शेवटच्या क्षणी ते कापल्याने त्यांची संधी हुकली होती.मावळात शेळकेंविरोधात शरद पवार गटाचा प्रतिस्पर्धी असू शकतो. पण,त्यांच्याकडे तुल्यबळ उमेदवारच दिसत नाही.तर, खेडवरही आघाडीतील शिवसेनेने पिंपरीसारखा दावा केलेला आहे.मात्र,ही जागाही आघाडीत राष्ट्रवादीलाच भेटेल, असा अंदाज आहे. तेथे त्यांच्याकडून सुधीर मुंगसे आणि अतुल देशमुख यांची नावे घेतली जात आहेत.एकूणच तीन अण्णांची उमेदवारी फिक्स असून त्यांचे प्रतिस्पर्धी,मात्र अद्याप निश्चीत नाहीत.दरम्यान, मावळमधील अण्णांना दमदार प्रतिस्पर्धी नसल्याने तसेच त्यांच्या करिष्म्यामुळे ते पुन्हा विजयी होतील,अशी चर्चा आहे.