ठाणे: ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या डोंबिवलीत वास्तव्यास असलेले पत्रकार स्वर्गीय लक्ष्मण पवार यांचे नुकतेच हृदयविकाराच्या त्रिव झटक्याने दुर्दैवी निधन झाले. पवार यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांच्या राहत्या घराचे वर्णन केल्यास, ते पत्र्याच्या घरात राहत होते, हे त्यांच्या कठीण परिस्थितीचे प्रतिक होते.
लक्ष्मण पवार हे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य नसतानाही, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय वाईट असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गांवकरी संपादक डॉ. विश्वासराव आरोटे यांना मिळाली. यानंतर, प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांच्या आदेशाने संबंधित कुटुंबाला मदत करण्याचा निर्णय घेतला व या कुटुंबाला निधी देण्यात आला.
डॉ. विश्वासराव आरोटे आणि संघाचे काही पदाधिकारी पवार यांच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी डोंबिवली येथे गेले. त्यांनी कुटुंबातील सदस्यांचे सांत्वन केले आणि त्यांना मदतीचा धनादेश, किराणा साहित्य आणि मुलांच्या शालेय साहित्याचे वाटप केले. या प्रसंगी नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण आणि पत्रकार विष्णू बुरे देखील उपस्थित होते.
लक्ष्मण पवार यांच्या कुटुंबाला या मदतीमुळे काहीसा दिलासा मिळाला असून, संघाच्या या कृतीने सामाजिक उत्तरदायित्वाचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे