भोसले सहकारी बॅंक घोटाळ्यात धाड,अटकेनंतर आता बांदलाच्या संपत्तीवर टाच
उत्तम कुटे
पिंपरीः पुणे येथील शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेतील दीडशे कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या गैरव्यवहारात ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) अटक केलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती आणि शिरुर तालुक्यातील एक बडं प्रस्थ मंगलदास विठ्ठलराव बांदल आणि त्यांच्या साथीदारांसह नातेवाईकांची ८५ कोटी रुपयांची संपत्ती काल (ता.१७) ईडीने जप्त केली.
पैलवान बांदलांसह हनुमंत संभाजी खेमधरे आणि सतीश ऊर्फ यतीश जाधव यांची आणि त्यांच्या नातेवाईकांच्या ८५ कोटींच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली आहे.खेमधरे हा भोसले बॅंकेत मॅनेजर होता.त्याने बांदलांच्या बेकायदेशीर कृत्याकडे दुर्लक्ष करीत कर्ज मंजूर केले होते.त्यामुळे तोच नाही,तर त्याच्यासह इतर अधिकारी,संचालक मंडळ आणि अध्यक्ष सुद्धा या गुन्ह्यात आरोपी असून त्यांनाही अटक झाली आहे.ईडीने अटक करण्यापूर्वी बांदल यांनी लोकसभा लढण्याची तयारी केली होती.त्यांना शिरुरमधून वंचित बहूजन विकास आघाडीने उमेदवारीही दिली होती.पण,त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने त्यांचे तिकिट कापण्यात आले होते.
ऑडिटमध्ये भोसले बॅंकेतील गैरव्यवहार समोर आला.त्यात बॅंकेचे अध्यक्ष अनिल भोसले यांच्याशी असलेल्या सबंधातून बांदल व साथीदारांनी खातेदार व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मालमत्ता बेकायदेशीरपणे गहाण ठेवून बॅंकेकडून त्यावर कर्ज घेतले होते.त्याबाबत प्रथम शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.त्यात बांदलांना २६ मे २०२१ ला अटक झाली. वीस महिने जेलमध्ये राहिल्यानंतर त्यांना जामीन झाला होता.दरम्यान,पोलिसांच्या तपासात मनी लॉंड्रिग झाल्याचे समजताच ईडीची एंट्री झाली.त्यांनी मनी लॉंड्रिंगचा गुन्हा नोंदवला. त्यात त्यांनी यावर्षी २० ऑगस्टला बांदलासह त्यांचे साथीदारांच्या घर व कार्यालयावर छापे मारले.त्यात पाच कोटी साठ लाखांची रोकड सापडली.त्यामुळे बांदल व सहकार्यांना ई़डीने अटक केली.बांदल अद्याप जेलमध्येच आहेत.दरम्यान,३१ मे २०२१ रोजी रिझर्व बॅंकेने भोसले बॅंकेचा दिवाळखोरीत काढून तिचा परवाना रद्द केला.